निघोज कुंड रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था; सिमेंट काँक्रीटीकरण होणे गरजेचे

सिमेंट काँक्रीटीकरण

पारनेर (तालुका प्रतिनिधी सुनील लोणकर) : राज्यात प्रसिद्ध असलेल्या जागृत व नवसाला पावणारी निघोज येथील श्री मळगंगा माता व जग प्रसिद्ध कुंड पर्यटन स्थळावरील रांजण खळगे आणि प्रसिद्ध असलेल्या कुंडाई देवस्थान रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविक व पर्यटकांची कुचंबना होत आहे , या तीन ते साडे तीन किलो मीटर रस्त्याचे मजबुती करणासह सिमेंट काँक्रीटीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे .

 

 

निघोज मुख्य बस स्थानक ते कुंड पर्यटन स्थळापर्यंत साडे तीन किलो मीटर तर निघोज गाव ते पालखी मार्गाने हे अंतर तीन किलो मीटर भरते आहे . या आधी या मार्गाचे डांबरीकरण होवून अनेक वर्षे झाली असून या मार्गाने प्रवास करणे , सध्या खूपच जिकीरीचे झाले आहे . रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता आहे , असा प्रश्न पडतो . निघोज हे पर्यटन स्थळ म्हणून राज्यात व परराज्यात ही प्रसिद्ध असून येथील ग्रामदैवत असलेल्या श्री मळगंगा देवीच्या दर्शनासाठी व कुंडा वरील कुंडाई चे दर्शन , जगप्रसिद्ध रांजण खळगे , लोखंडी झुलता पूल आणि कुंडा पलीकडे असलेल्या टाकळी हाजी च्या श्री कुंडाई च्या दर्शनाकरिता यात्रे व्यतिरिक्त वर्षेभरात लाखो भाविक भक्त व पर्यटक निघोज नगरीला दुचाकी , चार चाकी , एस टी बस वा इतर वाहनांनी भेट देत असतात .

 

 

निघोज येथील श्री मळगंगा देवीचे यथासांग दर्शन घेवून भव्य व दिव्य मंदिराला प्रदशिक्षणा घातल्यावर तृप्त मनाने जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या कुंडाकडे प्रस्थान करतात , पण दुसऱ्याच क्षणी हा तोच रस्ता आहे ना , जो जगाच्या नकाशावर ठळकपणे कुंड पर्यटन स्थळाकडे प्रस्थान करताना दाखविला आहे , हा रस्ता इतका खराब , ओबड, धोबड झाला आहे की , या रस्त्यावरील डांबराचे अक्षरशः ठिगळे ठिगळे झाले आहे , खड्ड्यात रस्ता की , रस्त्यात खड्डा असा प्रश्न नक्कीच प्रत्येक भाविक भक्त , पर्यटक व ग्रामस्थांना ही पडतो , अंतर अवघे तीन ते साडे तीन किलो मीटर चे , पण प्रत्यक्षात प्रवास करायला लागल्या वर हेच अंतर खूप जास्त वाटते . आपले वाहन कोणत्या बाजूने वा कोणता खड्डा चुकवून सुरक्षित पणे चालवावे , असा प्रत्येक वाहन चालकाला प्रश्न पडला नाही , तर नवलच .

 

श्री मळगंगा देवी ची यात्रा जवळ आली असून एप्रिल च्या साधारणतः दुसऱ्या आठवड्यात हळद लावली जाते , तर दि . २१ ,२२ ,२३ व २४ एप्रिल मध्ये श्री मळगंगा देवी चा यात्रोत्सव असतो . यावेळी राज्य व परराज्यातून आलेल्या भाविक भक्तांची संख्या काही लाखांमध्ये असते . या यात्रेचे ग्रामस्थांच्या वतीने अतिशय निटनेटके नियोजन केले जाते , नियोजनात कोणत्याही प्रकारची कमतरता नसते . गतवर्षी यात्रा नियोजन अतिशय उत्कृष्ट झाले होते , त्यावेळी एकही चोरी झाली नव्हती . यात्रा दोन दिवस गावात भरते , तर दोन दिवस कुंडावर भरते , यावेळी प्रचंड गर्दी व रहदारी असते . अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज व पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी ला जोडणारा महत्त्वाचा व जवळचा मार्ग असल्याने सदोदित मोठी रहदारी असणारा मार्ग असल्याने या तीन ते साडे तीन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण ऐवजी मजबूती करणासह सिमेंट काँक्रीटीकरण होणे , हे श्री मळगंगा देवीच्या एप्रिल मध्ये होणाऱ्या यात्रोत्सवाच्या आधी राज्यातील भाविक भक्त व पर्यटक आणि ग्रामस्थांसाठी अत्यंत गरजेचे आहे . हा रस्ता झाल्यास निघोज मधील व्यावसायिकां च्या व्यवसात तर भर पडेलच , त्याच बरोबर गावाच्या अर्थकारण वाढून गावाच्या वैभवात ही भर पडणार आहे . त्यामुळे गावातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून इच्छा शक्तीच्या जोरावर या विकासात्मक प्रश्नाकडे लक्ष द्यावे , अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here