जळगांव (संपादक सुनिल पाटील) : रुग्णसेवेसाठी पुढाकार घेत आज (दि.६) जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील खाजगी डॉक्टरांची विशेष बैठक संपन्न झाली.
या बैठकीत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत खाजगी रुग्णालयांचे अंगिकरण करणे आणि नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे या विषयी चर्चा करण्यात आली. या बैठकीला आयएमएचे पदाधिकारी, जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील आदी उपस्थित होते.
बैठकीत रुग्णसेवा आणि वैद्यकीय उपचारांची गुणवत्ता सुधारण्यासाठी चर्चा करण्यात आली तसेच जनआरोग्य योजनेंतर्गत तज्ञ सेवा पुरवणाऱ्या रुग्णालयांनी केलेल्या अर्जांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांना मोफत आणि किफायतशीर आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न घेण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थितांना केले.







