छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : शरीरसुखाला नकार दिल्याचा राग आल्याने १९ वर्षाच्या तरुणानं आपल्या नातेवाईक महिलेवर हल्ला करत तिच्या शरीरावर इतके वार केलेत की तिला तब्बल २८० टाके घालावे लागले. एक सव्वादोन फुटांचा वार तर मानेपासून मांडीपर्यंत आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, रविवारी दुपारी ही महिला शेतात काम करत असतांना तिचा नातेवाईक असलेल्या अभिषेकने तिला फोन लावत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र तिने नकार देत फोन कट केला. मात्र तिच्या नकाराचा राग आल्याने, महिला शेतातून संध्याकाळी घरी जात असतांना अभिषेकने तिच्यावर मागून हल्ला करत तिची वेणी ओढत तिचे डोके दगडावर आपटले. हातातील कटरने तिच्या चेहऱ्यावर,गळ्याव आणि संपूर्ण शरीरावर वार केले. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोवर अतिरक्तस्त्रावही झाल्याने, तिला ५ बाटल्या रक्त द्यावे लागले.
अभिषेक नवपुते काहीच न झाल्याच्या थाटात फिरत असतांना पोलिसांनी जेरबंद केला. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.







