जळगांव (संपादक सुनिल पाटील) : मिळालेल्या गोपनीय माहितीवर तात्काळ कारवाई करत शहरातील कुसुंबा भागातून एमआयडीसी पोलिसांनी गावठी कट्टा घेऊन फिरत असलेल्या इसमास अटक केली आहे. त्याच्याजवळून एकूण ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, शनिवार (दि.८ मार्च) रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पो.काँ. नितीन ठाकूर यांना गोपनीय माहिती मिळाली की, कुसुंबा परिसरात तुषार सोनवणे नावाचा इसम गावठी कट्टा घेऊन फिरत आहे. त्यांनी सदर बातमी तात्काळ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळविली.
पो.नि. संदीप पाटील यांनी यांनी गुन्हे शोधपथकातील पोउपनि चंद्रकांत धनके, पोका छगन तायडे, किरण पाटील, राहुल घेटे यांना कुसुंबा परीसरात जावून बातमीची खात्री करुन, योग्य ती कायदेशीर कारवाई करणेकामी रवाना केले. त्यानुसार सदर पथक हे कुसुंबा हॉटेल पुष्पा नशिराबाद रोडकडे फिरत असतांना मिळालेल्या बातमीप्रमाणे हॉटेल पुष्पासमोर एक इसम अंगात पिवळ्या रंगाचे शर्ट घालून मोटार सायकलवर बसलेला दिसला.
सदर पथक हे त्याचे जवळ जात असतांना तो मोटार सायकलसह पळून जाण्याच्या तयारीत असतांना पथकातील पोलीस अंमलदार यांनी शिताफीने त्याचा पाठलाग करुन त्यास पकडले. त्याची विचारपूस करता त्याने त्याचे नांव तुषार अशोक सोनवणे (रा. खेडी आव्हाणे) असल्याचे सांगितले. बातमीप्रमाणे पथकाची खात्री झाल्याने त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे उजव्या कमरेत २० हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा आणि दोन हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतुस मिळुन आले. तसेच ५० हजार रुपये किंमतीची होंडा शाईन मोटार सायकलसुध्दा मिळुन आली. असा एकुण ७२ हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह त्याला ताब्यात घेवुन त्याचेविरुध्द पोका नितीन ठाकुर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा रजि नंबर 147 / 2025 आर्म अॅक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा तपास पोउपनि चंद्रकांत धनके व पोना योगेश बारी करीत असून, ही कारवाई ही पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.







