होळी करा लहान, पोळी करा दान, बाळगु विवेकाचे भान; महाराष्ट्र अंनिसचे आवाहन

महाराष्ट्र अंनिस

भुसावळ (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर गिरीश पवार) : अलीकडे जवळपास प्रत्येक जातीं-धर्मांचे सण, उत्सव ,समारंभ, छोटे मोठे कार्यक्रम साजरे होत असतात. सण साजरे करताना एकप्रकारे उधाण व उन्मादी स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येते.

निसर्गाला ओरबाडून किंवा हानी पोहोचवूनच बहुतेक सणसमारंभ साजरे केले जातात. निसर्गहानी, पर्यावरणाचे संतुलन ढासळत आहे. प्रदूषणाचा भस्मासुर वाढत आहे. कोणतेही सण, उत्सव समारंभ, पूजाअर्चा, प्रार्थना आदी निसर्गाला मारक ठरणारे धार्मिक कर्मकांडे आहेत.हे आता उन्मादीपणाने आणि मोठ्या प्रमाणात साजरे करणे अजिबात परवडणारे नाही.

होळी सारखा पारंपरिक सण कालसुसंगत पद्धतीने साजरा करावा असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.दुर्गुणांची व दुष्प्रवृतींची होळी करणे, परिसरातील कचरा साफ करून होळी करणे,असा कृतिशील आणि विधायक पायंडा समाजात रुजवणे आता आवश्यक आहे.

मेहनतीची , कष्टाची कामे करून दिवस कंठणारे अनेक कष्टकरी बांधव आपल्या आजूबाजूला आजही उघड्यावर राहतात. त्यांच्या घरात त्यांना सणासुदीला गोडधोड करणे शक्य होत नाही. अशा गरजू व भुकेलेल्या वंचित कुटुंबाचा अगोदरच शोध घेऊन त्यांच्याशी बोलून, होळीची पोळी त्यांच्याकडे सन्मानपूर्वक सुपूर्द केली आणि शक्य झाल्यास त्यांच्या समवेत आपणही सेवन केली, तर खऱ्या अर्थाने होळी साजरी केल्याचा आनंद आपण घेऊ शकतो.यालाच पोळी दान करा असे आवाहन आपण होळी पुजा करताना आपल्या बांधवांना करु शकतो.दरवर्षी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सुमारे पन्नास ते साठ हजार पुरणपोळ्या गरजुंपर्यंत त्यांच्या वस्तीत वितरीत केल्या जातात.

होळीभोवती महिलांच्या संदर्भात अश्लील शब्द वापरून बोंबा मारण्याची अनिष्ट प्रथा अजूनही आपल्याकडे काही भागात टिकून आहे. याऐवजी होळीच्या ठिकाणी सांघिकपणे प्रबोधनपर सामाजिक ,सांस्कृतिक गाणी,गीतं म्हटली तर एक चांगला नाविन्यपूर्ण पायंडा आपण घातल्याचे समाधान आपल्याला नक्कीच मिळेल.

धुलीवंदनामध्ये रासायनिक रंगांचा वापर न करता, वनस्पतीचा नैसर्गिक रंगांचा वापर करावा. पाण्याशिवाय आपणास धुलीवंदन खेळता येऊ शकेल. रासायनिक रंगांपासून डोळ्यांना , त्वचेला गंभीर इजा होते. आपण टाळू शकतो. टिळा होळी गुलाल किंवा नैसर्गिक रंगाचा वापर करून आपण कपाळावर टिळा लावून टिळा होळी साजरी करावी.पाण्याचा अपव्यय टाळा.

सण साजरे करावेत पण निसर्गाचे भान राखून. होळी लहान करावी. लाकडे, गोवऱ्या, टायर किंवा तत्सम ज्वलनशील पदार्थांचा वापर होळीत करू नये. पुरणपोळी सारखे खाद्यपदार्थ होळीत न टाकता गरजूंच्या, भुकेलेल्यांच्या पोटातील आग शमवण्याचा संकल्प करून तो कृतीत आणावा, असे नम्र आवाहन महाराष्ट्र अंनिसच्या वतीने . दिगंबर कट्यारे, राज्य कार्यवाह वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प विभाग यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here