मुंबई (संपादक सुनिल पाटील) : कोणत्याही हाडाच्या कलाकाराची रंगभूमीची ओढ कधीच संपत नाही. इथे होणाऱ्या तिसऱ्या घंटेसोबत तो व्यक्तिरेखेत शिरतो. रंगमंचावरील जिवंत कला पाहण्याचा अनुभव रसिकांना देताना स्वत:लाही धन्य मानू लागतो. अभिनेते सचिन खेडेकरही याला अपवाद नाहीत. २१ वर्षांनी सचिन खेडेकर यांची पाऊले रंगभूमीकडे वळली आहेत.जिगिषा अष्टविनायक एक नवीन नाटक घेऊन येत आहेत. चंद्रकांत कुलकर्णी सादरकर्ते असलेल्या ‘भूमिका’ या नाटकाद्वारे सचिन खेडेकर रंगभूमीवर पुनरागमन करणार आहेत.
सचिन खेडेकर यांनी मराठीपासून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत एक नाव प्राप्त केले आहे. “आयुष्यात प्रत्येकाच्याच वाट्याला एक ‘भूमिका’ येते. भूमिका जगण्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी कलावंतच असण्याची गरज नसते…” असे त्यांनी यावेळी सांगितले.
आता आगामी ‘भूमिका’ या नाटकात ते कोणत्या रूपात रसिकांच्या भेटीला येतात याची उत्सुकता आहे. मात्र त्यांच्या भूमिकेचा खुलासा अद्याप झाला नाही आहे. ‘भूमिका’ या नाटकात इतर कोण कलाकार पाहायला मिळणार हे देखील अजून स्पष्ट झाले नाही. ‘भूमिका’ नाटकाचे लेखन क्षितीज पटवर्धन यांनी केले असून, चंद्रकांत कुलकर्णी या नाटकाचे दिग्दर्शन करत आहेत. सध्या नाटकाची जोरदार तालीम सुरू असून, याच महिन्यात हे नाटक रंगभूमीवर येणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे.







