नासा (वृत्तसंस्था) : गेल्या ९ महिन्यांपासून भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळात स्थानकात अडकल्या आहेत. त्यांच्या परत येण्यासाठी नासा एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्ससोबत मिळून काम करत आहे. दोन दिवसांपूर्वी १६ मार्च रोजी दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर परतणार असल्याची अधिकृत माहिती नासाने जाहीर केली होती. मात्र, अंतराळवीरांची परत येण्याची योजना आणखी लांबणीवर पडली आहे.
दोन्ही अंतरावीरांना परत आणण्यासाठी स्पेसएक्सचे फाल्कन रॉकेट चे १२ मार्च रोजी प्रक्षेपण होणार होते. मात्र, प्रक्षेपणादरम्यान तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या यामुळे फाल्कन उड्डाण घेऊ शकले नाही. नासाने दिलेल्या माहितीनुसार, ग्राउंड सपोर्ट क्लॅम्प आर्मच्या हायड्रॉलिक सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने ही मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे.
दरम्यान सुनिता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून पत्रकार परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, पृथ्वीवर त्यांच्या परत येण्यात पुन्हा एकदा अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, “सगळ्यात कठीण बाब म्हणजे, पृथ्वीवरील लोकांना आमच्या परत येण्याबद्दल काही माहिती नाही. त्यांच्यासाठी हा एक भावनिक प्रसंग आहे. कदाचित आमच्यापेक्षाही जास्त.” हा त्यांच्यासाठी सर्वात कठीण काळ आहे.







