इस्लामाबाद (वृत्तसंस्था) : बलुचिस्तानमध्ये जफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण करण्यात आले आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने जबाबदारी स्वीकारत असा दावा केला आहे की ट्रेनमध्ये २१४ पाकिस्तानी सैनिकांसह एकूण ४२६ प्रवासी होते. वृत्तानुसार, आतापर्यंत ६० सैनिक मारले गेले आहेत, तर १५० अजूनही ओलीस आहेत. तसेच बीएलएच्या ताब्यात ४३ पंजाब रेजिमेंटशी संलग्न असलेला पाकिस्तानी लष्कराचा एक वरिष्ठ अधिकारी कॅप्टन रिझवान आहे.
दरम्यान पाकिस्तानी लष्कराने ही कारवाई संपल्याचे जाहीर केले आहे. यादरम्यान २१ प्रवाशांना जीव गमवावा लागला असून चार निमलष्करी दलांचे जवान मारले गेले. लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी कारवाईदरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्व ३३ बंडखोरांना ठार केले.
सशस्त्र दलांनी सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती लेफ्टनंट जनरल शरीफ यांनी दिली. ते म्हणाले की, मंगळवारी बंडखोरांनी ट्रेनवर हल्ला केला, ज्यामध्ये २१ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यात निमलष्करी दल फ्रंटियर कॉर्प्सचे चार जवानही शहीद झाले. लेफ्टनंट जनरल शरीफ यांच्या म्हणण्यानुसार, लष्कराने प्रत्युत्तर देत सर्व 33 दहशतवाद्यांना ठार केले आणि ओलिसांची सुखरूप सुटका केली.







