जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; मुद्देमाल जप्त

आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

भुसावळ (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर गिरीश पवार) : चाळीसगाव, अमळनेर, भडगाव आणि मुक्ताईनगर येथील वेगवेगळ्या चार गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात जिल्हा पोलीस प्रशासनाला यश आले आहे. यामध्ये चारही गुन्हे एका टोळीने केले असल्याचे समोर आले असून ही टोळी मध्यप्रदेशातील असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.

 

 

या संदर्भात अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील वाडे येथील सुनील निंबा पाटील यांच्या मुलीचे लग्न १७ फेब्रुवारी रोजी चाळीसगाव शहरातील विराम लॉन्स येथे होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी १० लाख ४१ हजार रुपये किमतीचे ९ प्रकारच्या दागिन्यांची पिशवी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. या घटनेबाबत जळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासह मुक्ताईनगर येथील रोख रक्कम १ लाख ५० हजार रुपयांची चोरी, भडगाव येथील १ लाख ३५ हजार रुपयांची चोरी, अमळनेर येथील रोख ४० हजार रुपयांची चोरी असे इतर तीन चोरीचे गुन्हे दाखल होते.

ही चोरी एकाच जोडीने एकाच पद्धतीने केल्याचे समोर आले. दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि तांत्रिक मदतीच्या आधारे मध्यप्रदेशातून या गुन्ह्यातील १६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र यातील संशयित चोरटे हे फरार आहेत. पोलिस यंत्रणा या टोळीचा शोध घेत असून पुढील चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक जळगाव अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव कविता नेरकर, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, चाळीसगाव पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि कुणाल चव्हाण, गणेश वाघमारे, पो.ना. भगवान पाटील, श्रीकृष्ण देशमुख, पोकॉ महेश पाटील, महेश सोमवंशी (सर्व स्थानिक गुन्हे शाखा जळगाव, पोह नितीन सोनवणे, पोकॉ किरण देवरे (चाळीसगाव ग्रामीण पोलीस), तसेच मुक्ताइ४नगर पोह राजकुमार चव्हाण, पोना सुरेश मेंढे, पोकॉ सुनिल मोरे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here