भुसावळ (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर गिरीश पवार) : वाईट सवयी, व्यसनांना तिलांजली देऊन चांगले विचार, संस्कार अंगी बाळगण्याचा संकल्प करत शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील (नंबर १) च्या विद्यार्थ्यांनी होळी सण अनोख्या पद्धतीने साजरा केला.
यावेळी मुख्याध्यापक सतीश कोळी यांनी होळी का व कशी साजरी करतात, याविषयी आख्यायिका सांगितली. कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागचा उद्देश सांगताना कोळी म्हणाले, मनातील वाईट विचार होळीप्रमाणे जाळून त्याची राख करावी. त्यामुळे आपले मन निर्मळ होईल. रंग खेळताना घ्यावयाची काळजी, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. कल्पना सुर्यवंशी यांनी वाईट विचार कोणकोणते याविषयी माहिती दिली.
कन्नड नंबर तीन च्या विद्यार्थ्यांनीही यात सहभाग घेतला यावेळी विद्यार्थ्यांनी दारिद्र्य (गरीबी), निराशा, निरक्षरता, अशिक्षितपणा, रोज उशिरा उठणे, उशिरा शाळेत येणे, घाणेरडे व अस्वच्छ रहाणे, भांडण करणे, गैरहजर रहाणे, आळस, कंटाळा करणे, शाळा न शिकणे, दारू सिगारेट पिणे, तंबाखू खाणे, भ्रष्टाचार न करणे, निरक्षरता, अज्ञान,या वाईट सवयी व व्यसनांचे छोटे बॅनर बनवून ते होळीत जाळण्यात आले. प्रारंभी होळीचे पूजन मुख्याध्यापक सतीश कोळी यांनी केले. यावेळी अर्चना पाटील,सुवर्णा गायके,दिपाली गायकवाड फरहीन पठाण,कल्याण राऊत सह परिसरातील पालक व विद्यार्थी उपस्थित होते.







