शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : देशातील शेतकऱ्यांना नाबार्ड स्वस्त व्याजदराने पीक कर्ज देत आहे का; तसेच देशातील सर्व राष्ट्रीयीकृत बँका आणि खाजगी बँका शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदराने कर्ज देतात का,असल्यास, त्याचे तपशील; आणि गेल्या तीन वर्षात आणि चालू वर्षात राष्ट्रीयीकृत बँका आणि खाजगी बँकांनी पीक कर्ज दिलेल्या शेतकऱ्यांची संख्या, वर्षनिहाय आणि राज्यनिहाय विशेषतः महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यासह किती शेतकऱ्याना झाला याची विचारणा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी लोकसभेत अतारांकित प्रश्नद्वारे केली.
अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सुधारित व्याज अनुदान योजनेअंतर्गत (एमआयएसएम) भारत सरकार किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ७% दराने अल्पकालीन खेळते भांडवल कर्ज प्रदान करते १.५% व्याज अनुदान देते.अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी प्रभावी व्याजदर ४% आहे.नाबार्ड शेतकऱ्यांना थेट कर्ज देत नाही. तथापि, शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी नाबार्ड बँकांना पुनर्वित्त सुविधा प्रदान करते.
नाबार्डने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षात पीक कर्ज दिलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येची राज्यनिहाय/केंद्रशासित प्रदेशनिहाय माहिती देवून सन 2024-2025 मध्ये महाराष्ट्रांत 11.53 (लाख ) शेतकऱ्याना लाभ मिळालेला असून अहमदनगर जिल्ह्यात त्याची संख्या 1.07 (लाख )असल्याचे अर्थ राज्यमंत्री श्री पंकज चौधरी यांनी सांगितले.







