नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : अवैध सावकारी, ठार मारण्याची धमकी देणे आणि पोक्सो कायद्यांतर्गत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आर्थिक व्यवहारातून फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपात भाजपा पदाधिका-याला अटक झाल्याने, शहरात खळबळ उडाली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीला रोहित कुंडलवालने पैशाच्या व्यवहारातून त्रास देत होता. पैसे देत नसल्याने त्याने फिर्यादीच्या १५ वर्षीय मुलीला पिस्तुलाचा धाक दाखवला आणि तिचा विनयभंग केला. पैशासाठी धमकी देणे आणि लोकांकडून बळजबरीने पैसे उकळणे हा रोहित कुंडलवाल आणि त्याच्या वडिलांचा उद्योग आहे.
नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यातील पोलिसांनी आरोपी रोहित कुंडलवालला मध्यरात्री बेड्या ठोकल्या. पण त्याचे वडील कैलास कुंडलवाल अद्यापही फरार आहेत. दरम्यान पोलिसांनी रोहित कुंडलवालकडून ३ मोबाईल, आलिशान कार, पिस्तुल आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.
फिर्यादीच्या तक्रारीनंतर हा प्रकार समोर आला. या घटनेमुळे नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. रोहित कुंडलवालच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. त्याच्या फरार वडिलांनाही अटक व्हावी असे लोक म्हणत आहेत.







