स्मशानातील नारळ लिंबाच्या उताऱ्याने पेणमध्ये जादूटोण्याची चर्चा

पेणमध्ये जादूटोण्याची चर्चा

मुंबई (संपादक सुनिल पाटील) : विघ्नहर्त्या गणरायाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पेण महाराष्ट्रभर प्रसिध्द आहे. पण तालुक्यातील नाडा गावातील स्मशानभूमीत अघोरी जादूटोण्याच्या नावाखाली अज्ञात व्यक्तींकडून पूजाविधी सुरु असल्याची गोष्ट ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना ही बाब कळवली. पोलिसांनी संबंधित प्रकार करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पेण तालुक्यातील नाडा गावातील स्मशानभूमीच्या शेडमध्ये नारळ, लिंबू, मानवी कवटी, अगरबत्ती, डमरू, पेटलेले नारळ, गोमूत्र, भगवा कपडा, शंख, लाकडाच्या छोट्या जुड्या, भस्माची डबी आदी साहित्य घेऊन आरोपी बिपीन अंबिका शर्मा, राजेश किसन म्हात्रे, प्रशांत राजेंद्र शिर्के (तिन्ही रा.कोपरखैरणे, नवी मुंबई) जादूटोणा करण्यासाठी आले होते. मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेने हे तिघेही पोलिसांच्या हाती लागले आहेत.

प्रथमदर्शनी गावकऱ्यांना प्रकार कळल्यानंतर त्यांनी या तिघांकडे विचारणा केली असता, ते पळून जावू लागले होते. ग्रामस्थांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी गाडी अंगावर घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आरोपींसह गाडी तेथून जाऊ न देता पेण पोलिसांना कळविले.

खबर मिळताच तात्काळ पेण पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समर बेग आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. आरोपी आणि त्यांची गाडी ताब्यात घेवून पेण पोलिस ठाण्यात नेले. सर्व चाौकशी झाल्यानंतर भारतीय न्याय संहिता २०२३ ते कलम १०९ (१), ३ (५) सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष व अनिष्ट प्रथा व जादूटोणा प्रतिबंध करण्याकरिता व त्यांचे समूळ उच्चाटनासाठी अधिनियम २०१३ ते कलम ३ (१) (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या निरीक्षणाखाली पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक महिला पोलिस निरीक्षक अस्मिता पाटील या करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here