पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. महानगरपालिका प्रशासनाने आता थकबाकीदारांच्या पाच लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्या मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली आहे. ही जप्ती मोहिमेमध्ये महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी होत आहेत. गुरुवार (२० मार्च) रोजी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी थेट महानगरपालिका कार्यक्षेत्रात चिखली, तळवडे, आकुर्डी, वाकड झोनमधील मिश्र, बिगनिवासी, व्यावसायिक थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त केल्या असून निवासी मालमत्ता कर थकबाकीदारांच्या मालमत्तांचे नळ कनेक्शन तोडणीची कारवाई करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन व आकारणी विभागामार्फत मालमत्ता कर आकारणी करण्यात येते. मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात आहे. वारंवार आवाहन करून देखील जे मालमत्ताधारक मालमत्ता कर भरत नाहीत, त्यांना नोटीस देण्यात येत आहेत. त्यानंतरही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या आता थेट मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी मालमत्ता कर विभागाची प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयात पथके कार्यरत करण्यात आली आहे. त्यातच आता आर्थिक वर्ष 2023-24 संपण्यासाठी अवघे बारा दिवस शिल्लक राहिल्यामुळे आता थेट जप्ती कारवाई करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी ऑन ग्राऊंड दिसू लागले आहेत.
गुरुवारी चिखली येथील श्री. संदीप प्रकाश मोरे यांच्या मिश्र मालमत्तेकडे 23,49,508 लाख रुपयांची थकबाकी असल्याने मालमत्ता जप्तीची व नळ कनेक्शन तोडणीची कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर, तळवडे येथील भालेकर नवनाथ तुकाराम व इतर यांच्या इंडिया टूल्स या औद्योगिक मालमत्तेकडील 20 लाख 64 हजार रुपयांच्या थकीत रकमेपोटी मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात आली. याचबरोबर, बेळळे माधव नागप्पा यांच्या मिश्र मालमत्तेकडील 16 लाख 93 हजार 597 इतक्या रक्कमपोटी, आकुर्डी येथील मे. हॉटेल पन्हाळगड तर्फे विवेक सोपान काळभोर/गोपाळ धों. काळभोर व इतर 2 यांच्याकडील 28,37,203 इतक्या थकीत रकमेपोटी, हॉटेल शेतकरी मळा तर्फे अनिकेत भगवान काळभोर यांच्या 23,38,522 इतक्या थकीत रकमेपोटी, मे. हॉटेल कबाबकरी तर्फे ओंकार अरुण काळभोर यांच्या 10,75,404 इतक्या थकीत रकमेपोटी तर मे. शेतकरी मळा मिसळ हाऊस तर्फे अजिंक्य भगवान काळभोर यांच्या 1,89,846 इतक्या थकीत रकमेपोटी तर वाकड येथील धनाजी रामभाऊ विनोदे यांचे हॉटेल अजिंक्य यांच्याकडील 14,44,902 इतक्या थकीत रकमेपोटी मालमत्ता जप्तीची कारवाई करून मालमत्ता सील करण्यात आल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त, प्रशासन अधिकारी, सहाय्यक मंडलाधिकारी, गटप्रमुख आदींच्या उपस्थितीत सदर कारवाई करण्यात आली.







