अमेरिकेतील ब्रुकलिन पार्क भागात विमान कोसळले

विमान कोसळले

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ब्रुकलिन पार्क येथे एक भीषण विमान अपघात झाला आहे. शनिवारी संध्याकाळी एक सिंगल-इंजिन विमान अनियंत्रित झाल्याने थेट एका निवासी घरावर कोसळले. या अपघातात विमानातील एकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून, विमानात किती प्रवासी होते याबाबत निश्चित माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

 

विमान घरावर कोसळल्यानंतर भीषण आग लागली, मात्र घरात राहणाऱ्या लोकांना कोणतीही दुखापत झाली नाही, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. यूएस एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनच्या माहितीनुसार, हे विमान आयोवा येथील डेस मोइनेस विमानतळावरून मिनेसोटाच्या अनोका काउंटी-ब्लेन विमानतळाकडे निघाले होते. उड्डाणानंतर काही वेळातच विमानाचा ताबा सुटला आणि ते अनियंत्रितपणे ब्रुकलिन पार्कमधील काइल अव्हेन्यूवरील एका घरावर आदळले.

 

अपघातानंतर स्थानिक अग्निशमन विभाग आणि आपत्कालीन सेवांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ब्रुकलिन पार्क फायर चीफ सीन कॉनवे यांनी सांगितले की, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले तेव्हा घर पूर्णपणे आगीच्या ज्वाळांनी वेढले गेले होते. अनेक तास प्रयत्न केल्यानंतर आग विझवण्यात यश आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here