हिंगोली (जिल्हा क्राइम रिपोर्टर विष्णु हनवते) : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांमध्ये बनवाबनवी सुरु असल्याचा आरोप केला जात असून शासनाकडून प्रत्यक्षात साडेसहा कोटी रुपयांचा निधी मिळाला असतांना जिल्हा जलसंधारण विभागाकडून तब्बल २४ कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. तर अनेक ठिकाणी कामे संशयाच्या भोवर्यात असुन या कामांची चौकशी करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानात दुसर्या टप्प्यात ७३ गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यातील १४, कळमनुरी १६, औंढा नागनाथ ११, सेनगाव १४ तर वसमत तालुक्यातील १८ गावांचा समावेश आहे. या गावांमधून मृद व जलसंधारण विभाग, लघु सिंचन विभाग, कृषी विभाग, पूर्णा पाटबंधारे विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग या प्रमुख विभागांकडून कामे केली जात आहेत. या कामांमध्ये ढाळीचे बांध, सलग समतल चर, माती नाला बांध, अनघड दगडी बांध, गॅबीयन बंधारा, रोपवन, वृक्षलागवड, तलावांची दुरुस्ती, गाळ काढणे या कामांचा समावेश आहे. प्रत्येक विभागाने या गावांमधन केल्या जाणार्या कामाचा आराखडा तयार करून जिल्हा जलसंधारण विभागाकडे सादर केला आहे. त्यानुसार या कामांना तांत्रीक व प्रशासकिय मान्यताही मिळाली असून कामे सुरु झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शासनाकडून ६.५० कोटींचाच निधी
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे सुरु झाली आहेत. मात्र १०११ कामे पूर्ण होऊन त्यावर २४ कोटींचा खर्च झाला असला तरी सदर कामे अभिसरणामध्ये झाली असावीत. सध्या मार्च अखेरची गडबड असल्यामुळे नंतर पाहून सांगतो.
– प्रफुल्ल खिराडे,
जिल्हा जलसंधारण अधिकारी हिंगोली
दरम्यान, जिल्ह्यात दि.१८ मार्च अखेर पर्यंत १०११ कामे पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले असून हि कामे १०६३ हेक्टर क्षेत्रावर झाले तर या कामांवर २४ कोटींचा खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र या कामांसाठी शासनाकडून प्रत्यक्षात दोन टप्प्यात आलेल्या निधीमध्ये एका टप्प्यात ५ कोटी तर दुसर्या टप्प्यात १.५० कोटी रुपये आल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे शासनाकडूनच ६.५० कोटींचा निधी आल्यानंतर २४ कोटींचा खर्च झाला कसा हा संशोधनाचा विषय बनला आहे. तर या बाबतची कामेही संशयाच्या भोवर्यात असून या कामांची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.







