सावदा (तालुका क्राईम रिपोर्टर अजहर खान) : शहरात मोकाट कुत्र्यांचा त्याच बरोबर डुकरांचा उपद्रव जास्त प्रमाणात वाढला आहे. रस्त्यावरुन मोकाट कुत्र्यांची टोळकी फिरत असून शहरातील नवीन भागातील कॉलन्यांमध्ये उच्छाद मांडला आहे.
भटक्या कुत्री पकडली जात नसल्यामुळे शहरभर त्यांची संख्या वाढली. ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे कुठेही खाद्यान्न मिळत असल्याने कुत्र्यांचा तसेच डुकरांचा सुळसुळाट वाढला. ही कुत्री पादचाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रमाणही वाढले आहे, रात्रीच्या वेळी १० ते १५ कुत्र्यांची टोळकी रस्त्यावर फिरत असतात. त्यामुळे नागरिकात दहशत आहे. काही ठिकाणी नागरिक आणि लहान मुलांना कुत्रे चावण्याची समस्या वाढू लागली आहे. त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांसह वृद्ध तसेच लहान मुले व महिलांच्या जीवितास धोका निर्माण होत असून येथील नगरपरिषद कडून नागरिकांची समस्या लक्षात घेता मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्या नेतृत्वाखाली मोकाट कुत्रे पकडण्याची मोहिम शहरात सुरू करण्यात आली आहे.
पकडलेल्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण (Sterilization)करून, त्यांची संख्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी पालिका प्रशासन काय पावले उचलते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शहरातील कचरा व्यवस्थित उचलला न गेल्याने, कुत्रे त्याचप्रमाणे डुकरे कचऱ्यात अन्न शोधण्यासाठी येतात, त्यामुळे कचरा व्यवस्थापनावर लक्ष देणे आवश्यक आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. शहरात तसेच नवीन कॉलन्यांमध्ये कुत्र्यांप्रमाणेच डुकरांची समस्या सुध्दा खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भटक्या व मोकाट डुकरांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा व साथीचे रोग पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे भटक्या आणि मोकाट डुकरांवर तसेच त्यांना पाळणा-या व्यक्तींवर पालिका प्रशासन काय पावले उचलते हे सुद्धा पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.







