शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : इंडियन बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस फेडरेशन यांच्यावतीने शिर्डी येथे ६५ वी सिनिअर नॅशनल बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस चॅम्पियनशिप स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेसाठी २९ राज्यातून पुरुष आणि महिला असे एकूण सुमारे ३७५ बॉडी बिल्डर उपस्थित होते. भारतीय शरीर सौष्ठवाची खरी श्रीमंती ज्या स्पर्धेत मंचावर उतरते त्या मानाच्या प्रतिष्ठेच्या भारत श्री शरीर सौष्ठव स्पर्धेचा पिळदार डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा इंडियन बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस फेडरेशन यांच्या विद्यमाने जोशपूर्ण वातावरणात पार पडला. या स्पर्धेला सागर कार्तुडेच्या रूपाने विजेता लाभला.
ही स्पर्धा इतकी थरारक होती की, स्पर्धेत खेळणाऱ्या स्पर्धकांसह पंचांनाही विजेता कोण ठरणार याबाबत अंदाज नव्हता. प्रत्येक गटात मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी झाल्यामुळे त्या त्या गटातील अव्वल खेळाडूंची निवड करताना पंचांना चांगलीच कसरत करावी लागली. दहा गटातील अव्वल खेळाडू भारत श्री जेतेपदासाठी पोझिंगसाठी उतरले होते. सागरने सेना दलातील स्वप्नील नरवडकर, पी.टी. अनबन, मणिपूरच्या रॉबी मेतेई, महाराष्ट्राचा हरमित सिंग व उमेश गुप्ता, दिल्लीचा नवीन या तगड्या खेळाडूंवर मात करत विजेतेपदाला गवसणी घातली. स्पर्धेच्या आयोजनात आयबीबीएफएफचे सरचिटणीस डॉ. संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे यांनी सिंहाचा वाटा उचलला.
स्पर्धेतील विजेत्यांना डॉ. संजय मोरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, एअरपोर्ट अथॉरिटीचे डेप्युटी कमिशनर अमिश कुमार, शरीर सौष्ठव संघटनेचे अजय खानविलकर, कोषाध्यक्ष राजेश सावंत, अरविंद मोदक, फिल्मस्टार एम कामराज, सिद्धांत मोरे, प्रथम नगराध्यक्ष कैलासराव कोते, शिवाजी गोंदकर, बाबासाहेब कोते, भीमाशंकर सोनवणे, सुधाकर शिंदे, सुजित गोंदकर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, कैलास सदाफळ, कैलास कातोरे, तानाजी गोंदकर, डॉ. अमर देशमुख, गफ्फारखान पठाण आदी उपस्थित होते. यावेळी प्रत्येक गटातील सहा विजेत्यांना मेडल आणि सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले. दोन दिवस सुरु असलेल्या स्पर्धेला युवकांची लक्षणीय उपस्थिती लाभली.
तंदुरुस्त शरीर ही आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. संपत्तीपेक्षा आरोग्य चांगले असेल तर आपल्याला जीवनात कुठलीही गोष्ट साध्य करणे अवघड नाही. म्हणूनच तरुण पिढीने व्यायामाला महत्व द्यावे व व्यसनापासून दूर राहावे याकरिता प्रत्येक वर्षी शिर्डीत राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करून आरोग्याचे महत्व पटवून देण्याचे काम या माध्यमातून केले जाते. मागील वर्षापेक्षा यावर्षी महिला व पुरुष स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन शरीरसौष्ठवच्या विविध थरारकांचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांची मने जिंकली.







