जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर विनोद पाटील) : ट्रकचालकाकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पाचोरा पोलिस ठाण्यातील तीन वाहतूक पोलिसांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
व्हायरल व्हिडिओमध्ये पोलिस कर्मचारी पवन पाटील एका ट्रकचालकाकडून ५० रुपये घेत असल्याचे दिसत आहे. या घटनेची दखल घेत पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तातडीने चौकशी करून पवन पाटील यांना निलंबित केले आहे. तसेच घटनेच्या प्राथमिक तपासात पाटील यांनी ट्रकचालकाकडून ५० रुपये घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
या व्हिडिओमध्ये आणखी दोन पोलिस कर्मचारीही उपस्थित असल्याने त्यांची भूमिका संशयास्पद आढळून आली आहे. त्यामुळे त्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. पूर्ण चौकशी अंती दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी स्पष्ट केले आहे.







