सातारा (उपसंपादक लव चव्हाण) : स्वतःच्या दोन महिन्यांच्या मुलाची विष पाजून हत्या केल्याप्रकरणी वाई तालुक्यातील सुरूर येथील रणजित सुरेश बुलुंगे (वय 33) याला वडूज येथील जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी, रणजित बुलुंगे याला 2 महिने 19 दिवसांचा वेदांत नावाचा मुलगा होता. तो मुलगा दत्तक देण्याबाबत त्याने पत्नीच्या माहेरकडील लोकांशी चर्चा केली होती. परंतु, त्यांनी वेदांतला दत्तक देण्यास विरोध केला. त्याचा राग मनात धरून बिदाल (ता. माण) येथील पत्नीच्या माहेरी दि. 20 जानेवारी 2018 रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास रणजितने टॉनिकच्या बाटलीत विषारी औषध मिसळून ते वेदांतला पाजले. काही वेळाने त्याला त्रास सुरू झाल्याने त्याला तत्काळ सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोनि प्रवीण पाटील यांनी साक्षीदारांचे जाब-जबाब नोंदवले, तसेच वैद्यकीय पुरावे जमा केले व कसून तपास करून आरोपींविरुद्ध वडूज येथील जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्यात सरकारी वकील वैभव काटकर यांनी काम पाहिले. सरकार पक्षाच्यावतीने 11 साक्षीदार तपासले. साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी आरोपीला दोषी ठरवून जन्मठेप व 10 हजार दंड व दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. हा खटला चालवण्यासाठी पोलिस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे, सपोनि दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॉसिक्युशन स्क्वाड पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, महिला पोलिस हवालदार विजयालक्ष्मी दडस, पोलिस कॉन्स्टेबल सागर सजगणे, जयवंत शिंदे, अमीर शिकलगार यांनी सहकार्य केले.







