शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : साईबाबा संस्थान सोसायटीच्या निवडणुकीत यापुढील काळात निवडून कोणीही येवो आमची सर्वसमावेशक आणि सहकार्य करण्याची भूमिका कायम असणार असून विठ्ठल पवार जरी मागील काळात आमचे विरोधक असले तरी हा माणूस सच्चा आणि प्रामाणिक आहे, अशी स्पष्ट प्रतिक्रिया माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली.
साई संस्थान एम्प्लॉइज क्रेडिट को-ऑप. सोसायटीच्या वतीने चेअरमन विठ्ठल पवार यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षापासून संस्थेच्या कर्मचारी सभासदांसाठी मराठी नूतन वर्ष गुढी पाडवा निमित्त शिधा वाटपाचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. यावेळी देखील कायम सभासदांना डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते शिधा वाटप करण्यात आले. कायम कर्मचाऱ्यांना १ किलो गुळ, १ किलो हरबरा डाळ, १ किलो बेसन पीठ, १ किलो तांदूळ, १ लिटर गोडेतेल, अर्धा किलो देशी तूप आणि गाठी कडे आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीप भोसले, बी. डी. दाभाडे, विश्वनाथ बजाज, प्रज्ञा महांडुळे, मंगला वराडे, साई मंदिर सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी आर्दीसह संचालक मंडळ आणि कर्मचारी उपस्थित होते.
साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवारांच्या नेतृत्वात सोसायटीचा कारभार प्रामाणिक आणि पारदर्शी सुरू आहे. चांगली फळे असलेल्या झाडांना लोक दगड मारतात. माझ्याकडे सुद्धा अनेक तक्रारी येत असतात. पण तुम्ही तुमचे काम सुरू ठेवा निंदकांची चिंता करू नका.
– गोरक्ष गाडीलकर,
मुख्य कार्यकारी अधिकारी
सोसायटीच्या वतीने माल वाहतूक करिता खरेदी केलेल्या ई रिक्षा तसेच संस्थेने नव्याने विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या स्वतःच्या साई तीर्थ मिनरल वॉटरच्या बाटलीचे अनावरण डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चेअरमन विठ्ठल पवार यांनी आपल्या प्रास्ताविकात डॉ. सुजय विखे पाटील व कार्यकारी अधिकारी यांच्याकडे कामगारांच्या विविध प्रश्नांची लवकरात लवकर सोडवणूक व्हावी त्याचबरोबर ५९८ कर्मचारी देखील आता कायम व्हावे, अशी आग्रही मागणी केली. डॉ. सुजय विखे पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त राबविलेल्या मुदत ठेव योजनेतील लाभार्थी महिलांना पैठणीचे वितरण करण्यात आले. संस्थेचे सभासद कै. सुभाष घोडे यांच्या वारसांना नैसर्गिक मृत्यू विमा रक्कम १० लाख रुपयांच्या धनादेश देण्यात आला.







