एमआयडीसी पोलिसांची तात्काळ कारवाई : गोडावून फोडून चोरी करणारी टोळी ४८ तासात जेरबंद

एमआयडीसी पोलिसांची

जळगांव (संपादक सुनिल पाटील) : शहरातील एमआयडीसी परिसरात एम सेक्टरमध्ये अतुल मुळे यांच्या श्री प्रभू डिस्ट्रीब्युटर्स कंपनीतील गोडावूनचे शटर तोडून मंगळवारी (दि.२५) रात्री चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली होती. त्यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपींविरुध्द गुरनं २२९/२०२५ भा.न्या.सं.कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

श्री प्रभु डिस्ट्रीब्युटर्सकडे जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यांची रामबंधू मसाल्यांची डिलरशिप आहे. सदरच्या चोरीत रामबंधू मसाल्याच्या ८ लाख ३५ हजार रुपये किंमतीच्या ७१ गोण्या चोरीला गेल्या होत्या. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी याप्रकरणी तपास करणे व एमआयडीसी परिसर सुरक्षित करण्याबाबत सूचना दिल्या. त्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी घटनास्थळी गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोकॉ राहुल रगडे, गणेश ठाकरे, विशाल कोळी, सिध्देश्वर डापकर, रतन गीते या पथकासह जावून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे निरीक्षण केले.

 

आरोपितांनी ओळख पटू नये म्हणून तोंडाला रुमाल बांधून इको कारचा वापर करुन घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक विश्लेषणाने चोरीत वापरलेले वाहन व अज्ञात आरोपितांचे चेहरे निष्पन्न केले असता, गोडावूनचे मालक अतुल मुळे यांच्याकडे गेल्या १५ वर्षांपासून चालक असलेला अनिल पाटील (रा.मिल कॉलनी, खडका, ता.भुसावळ) याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेत त्याची विचारपूस केली असता, त्याने बाबूराव सुरवाडे (रा.पळासखेडा, ता.जामनेर), शिवा सुरेश पाटील (रा.भवानी नगर, खडका, ता.भुसावळ), राहुल बाविस्कर (रा.खडका, ता.भुसावळ) यांच्या साथीने घरफोडी केल्याचे कबूल केले.

पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत तीनही आरोपितांना जेरबंद केले. आरोपितांना कोर्टात उभे केले असतांना दि.२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. तसेच या आरोपितांकडून पोलिसांनी गुन्ह्यात चोरलेल्या ७१ गोण्या व चोरी करण्यासाठी वापरलेली इको गाडी जप्त केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर ४८ तासांच्या आत गुन्हा उघडकीस आणून, चोरीस गेलेला मुद्देमाल आरोपितांकडून हस्तगत केल्यामुळे एमआयडीसी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोउनि चंद्रकांत धनके व पोकॉ योगेश घुगे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here