जळगांव (संपादक सुनिल पाटील) : एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील अजिंठा चौफुली येथे नांदुऱ्याला जाण्यासाठी उभ्या असलेल्या वयोवृध्दाला आम्ही पण खामगावला जात आहोत असे सांगून रिक्षात बसवून घेतले. त्यांचेजवळ प्लास्टीकच्या पिशवीत २५ हजार रुपये रोख होते. मात्र काही अंतर गेल्यावर रिक्षातील इसमांनी त्यांना जागा नसल्याने, उतरवून दिले. उतरल्यावर प्लास्टीकची पिशवी बघितली असता, पिशवीला कट मारलेला दिसला व त्यातील पैसे दिसून आले नाहीत. या वृध्दाने रिक्षाला आवाज दिला पण रिक्षा न थांबता निघून गेली. त्यामुळे त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला येवून फिर्याद दिली.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी वाढत्या चोरीच्या गुन्ह्यांवर आळा बसवण्यासाठी नेत्रम नावाचा प्रोजेक्ट जळगाव शहरासाठी विकसित केला होता. या प्रोजेक्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सर्व कॅमेरे पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात जोडण्यात आले आहेत. याप्रकरणी तपास करणेकामी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी नेत्रम प्रोजेक्ट सीसीटीव्ही तपासण्याच्या सूचना दिल्या होत्या.
एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके, पोना प्रदीप चौधरी, पोकॉ राहुल रगडे, विशाल कोळी, रतन गीते, गणेश ठाकरे यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता, त्यांना संशयित रिक्षा मिळून आली. रिक्षाचालक वसीम कय्युम खाटीक (रा.मास्टर कॉलनी, जळगाव), याला ताब्यात घेवून त्याच्याकडे विचारपूस केली असता, सदर गुन्हा त्याने त्याचे साथीदार तौसीफ खान सत्तार खान (रा.रामनगर, मेहरुण, जळगाव) व एक अल्पवयीन अशांनी गुन्ह्याची कबूली दिली. तौसीफ खान हा सराईत गुन्हेगार असून, त्याचेवर जबरी चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत. या आरोपींबाबत गोपनीय माहिती काढून त्यांना पळून जाण्याची संधी न देता त्यास गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले. त्ायंच्याकडून गुन्ह्यातील वयोवृध्दाची चोरलेली २५ हजार रुपये रक्कम व गुन्ह्यात बापरलेली बजाज कंपनीची रिक्षा (क्रमांक एम.एच.१९ सीडब्ल्यू ५२५०) जप्त करण्यात आली आहे.
नेत्रम प्रोजेक्टद्वारे बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे एमआयडीसी पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे. शहरातील नागरिकांनी शहर अधिक सुरक्षित करम्यासाठी आपल्या परिसरात लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून नेत्रम प्रोजेक्टला मदत करण्याचे आवाहन जळगाव पोलिसांकडून करण्यात आले आहे.







