सोलापूर (क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : जिल्ह्यातील बार्शी येथे पतीसह तिघांनी मिळून एका विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. पती, मेहुणा आणि नणंदेकडून मारहाण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणी पीडितेने बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मेहुणा आणि नणंदेचे अनैतिक संबंध असल्याची माहिती पीडित महिलेने तिच्या पतीला दिली. यामुळे पीडितेच्या पतीला संताप अनावर झाला. त्याने महिलेवर अत्याचार करायला सुरुवात केली. रागाच्या भरात पिडीतेच्या पतीने तिला मारहाण केली. तिला विद्रुप करण्यासाठी तिचे जबरदस्तीने मुंडन केले. एवढ्यावरच न थांबता, त्याने पीडितेच्या भुवयांवरुन ट्रिमर फिरवल्याचे पीडित महिलेच्या फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.
अत्याचारानंतर पीडित महिलेने बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तिने पती, मेहुणा आणि नणंद यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनंतर तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्शी शहर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.