बॅंकॉक (वृत्तसंस्था) : सुमारे एक आठवड्यापूर्वी म्यानमार 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्याने हादरला होता. या विनाशकारी भूकंपामुळे प्रचंड विध्वंस झाला. दरम्यान मृतांचा आकडा ३ हजार पार झाला असून ५ हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत तर ३४१ लोक अद्यापही बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे.
सध्या बचावकार्य जोरात सुरु असून मलब्याखाली अडकलेल्या लोकांना वाचण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. सरकारने या भयानक आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या सन्मानार्थ एका आठवड्यासाठी राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा जाहीर केली आहे. भूकंपामुळे हजारो इमारती कोसळल्या आहेत. रस्ते आणि पूल उदध्वस्त झाले आहेत. स्थानिक माध्यांमानी दिलेल्या माहितीनुसारह, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दूरसंचार सेवाही विस्कळीत झाली असून अनेक लोकांनापर्यंत मदत पोहोचणे कठीण झाले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, चार रुग्णालये आणि एक आरोग्य केंद्रे देखील उदध्वस्त झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 32 रुग्णालये आणि 18 आरोग्य केंद्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. भारताकडून तात्पुरत्या काळासाठी एक मोबाईल हॉस्पिटल आणि रशिया-बेलारुसकडून एक संयुक्त हॉस्पिटल उभारण्यात आले आहे.







