पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : बी. जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (ससून) केलेल्या फर्निचरच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी कार्यालयीन वरिष्ठ सहाय्यक आणि कार्यालयीन अधीक्षक यांना १ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत ३२ वर्षीय व्यावसायिकाने तक्रार दिली आहे.
तक्रारदार यांचा फर्निचर सप्लायरचा व्यवसाय आहे. २०२३ मध्ये तक्रारदार यांनी वीस लाख रुपये किमतीचे फर्निचर बी. जे. शासकीय महाविद्यालयास दिले होते. तक्रारदार यांच्या एकूण बिलांपैकी दहा लाख रुपयांचे बिल सादर व मंजूर करण्याकरिता बोनवळे व चौधरी यांनी १३ टक्के प्रमाणे एक लाख तीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. १ एप्रिल रोजी याची तक्रार एसीबीकडे प्राप्त झाली होती. एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली. त्यात जयंत पर्वत चौधरी ( वय ४९, वरिष्ठ सहाय्यक), सुरेश विश्वनाथ बोनवळे ( वय ५३, कार्यालयीन अधीक्षक) या दोघांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
बोनवळे यांनी लाचेची रक्कम चौधरी यांच्याकडे देण्याचे सांगितले होते. बुधवारी रात्री उशिरा तक्रारदार यांच्याकडून शासकीय महाविद्यालयाच्या कार्यालयात चौधरी यांनी एक लाख रुपये रक्कम स्वीकारली. यावेळी एसीबीने दोघांना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







