एमआयडीसी पोलिसांनी सिंधी कॉलनी परिसरातून मोटारसायकल चोरी करणारी टोळी केली २४ तासात जेरबंद

मोटारसायकल चोरी

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : एमआयडीसी पोलिसांनी केवळ २४ तासांत मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून दोन सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. सिंधी कॉलनी परिसरातून चोरीला गेलेल्या मोटारसायकलींसह १.४० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.तक्रारदार यश मनोहरलाल अहुजा (वय २४, रा. केमिस्ट भवन, जळगाव) यांनी सांगितले की, ३० मार्च २०२५ रोजी रात्री ८ वाजता त्यांनी आपली सीबी झेड मोटारसायकल (क्र. MH-19-BA-1737) सिंधी कॉलनीतील सेवामंडळ मंदिरासमोर पार्क केली होती. रात्री ९ वाजता परत आल्यावर त्यांना गाडी जागेवर नसल्याचे दिसले. शोधाशोध करूनही गाडी सापडली नाही. त्यानंतर ३१ मार्च रोजी त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

 

शहरातील मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी तपासाला गती देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तातडीने तपास सुरू केला.

गुन्हे शोध पथकाने घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये दोन संशयित व्यक्ती मोटारसायकल चोरताना दिसल्या. पोलिसांनी संशयितांचा माग काढला असता, शनीपेठ पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आकाश संजय मराठे याचा या चोरीत सहभाग असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपला साथीदार माधव श्रावण बोराडे याचे नाव उघड केले.

पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या दोन मोटारसायकली जप्त केल्या. यामध्ये तक्रारदाराची सीबी झेड मोटारसायकल (MH-19-BA-1737, किंमत ८० हजार रुपये) आणि हीरो एचएफ डिलक्स (MH-19-BT-6945, किंमत ६० हजार रुपये) यांचा समावेश आहे. एकूण १.४० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दोन्ही आरोपींविरुद्ध बीएनएस कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या यशस्वी कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, विकास सातदीवे, योगेश बारी, किरण पाटील, नाना तायडे, राहुल घेटे आणि नितीन ठाकूर यांनी मोलाची भूमिका बजावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here