इस्लामाबाद (वृत्तसंस्था) : पाकिस्तानातील सिंध प्रांतातील थारपारकर जिल्ह्यात भव्य राम मंदिर बांधले जाणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर संपूर्ण हिंदू समाजात मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे, परंतु पाकिस्तानातील हिंदू समाजालाही त्याचा आनंद मिळावा यासाठी स्थानिक भक्तांनी हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे.
या मंदिराचे प्रमुख पुजारी थारू राम आणि स्थानिक हिंदू समुदाय मोठ्या निष्ठेने हे कार्य पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहेत. हे मंदिर कोणत्याही सरकारी अनुदानाचा किंवा राजकीय पाठिंब्याचा भाग नाही, तर केवळ भक्तांच्या श्रद्धेच्या आणि समर्पणाच्या जोरावर उभे राहत आहे. विशेष म्हणजे, मुख्य पुजारी थारू राम यांनी भारतातून गंगाजल आणले आहे, जे या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी महत्त्वाचे मानले जात आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावग्रस्त संबंधांमुळे पाकिस्तानी हिंदूंना अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनास जाणे कठीण झाले आहे. परंतु या भावनिक अंतराला भरून काढण्यासाठी थारपारकरमधील हिंदू समाजाने स्वतःच्या भूमीतच राम मंदिर उभारण्याचा संकल्प केला. थारपारकर जिल्ह्यातील मेघवाल बडा गावातील हिंदू समुदायासाठी हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर त्यांच्या अस्तित्वाचे प्रतीक बनले आहे. त्यांचा हा उपक्रम केवळ धार्मिक मर्यादेत न राहता सामाजिक ऐक्य आणि श्रद्धेचा एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.