न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) : हडसन नदीत एका बेल २०६एल-४ लॉन्गरेंजर ४ हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सीएनएनने याबाबत वृत्त देताना सांगितले की, मृतांमध्ये एक पायलट आणि तीन बालकांसह स्पेनहून आलेल्या एका कुटुंबाचा समावेश आहे.
हे हेलिकॉप्टर लोअर मॅनहॅटनहून उड्डाण करून स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या दिशेने गेले होते. यानंतर जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजकडे वळून ते न्यू जर्सीजवळ नदीत कोसळले. या अपघाताची माहिती न्यू यॉर्क शहराच्या महापौरांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी परिसरात ढगाळ वातावरण होते, हवामान विभागाच्या माहितीनुसार, अपघातावेळी वाऱ्याचा वेग १० ते २५ मैल प्रतितास दरम्यान होता. दृश्यमानता चांगली होती, मात्र हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. या दुर्घटनानंतर न्यू यॉर्क पोलिस विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत सांगितले की, वेस्ट साइड हायवे आणि स्प्रिंग स्ट्रीट परिसरात आपत्कालीन वाहनांची वर्दळ आणि वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने या दुर्घटनेची अधिकृत माहिती दिली आहे.







