तरणतारण (पंजाब) : ग्रामस्थांमधील वाद सोडविण्यासाठी गेलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तर अन्य एका पोलीस कर्मचार्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि. ९) रात्री उशिरा गावात घडली.
पोलीस उपनिरीक्षक चरणजीत सिंग हे या गोळीबारात मृत्युमुखी पडले. जखमी पोलिस कर्मचारी जसबीर सिंगवर यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आम आदमी पार्टीचे विद्यमान सरपंच आणि इतरांविरुद्ध श्री गोइंदवाल साहिब पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, चरणजित सिंग हे श्री गोइंदवाल साहिब पोलीस ठाण्यात तैनात होते. कोट मोहम्मद खान गावातील सरपंच कुलदीप सिंग यांच्या मुलाचा त्याच गावातील अर्शदीप सिंगशी सुमारे दहा दिवसांपासून वाद सुरू होता. या वादावरून दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. विरोधी पक्षांनी आपचे सरपंच कुलदीप सिंग आणि इतरांविरुद्ध श्री गोइंदवाल साहिब पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. बुधवारी (दि. ९) सकाळी ११ वाजता दोन्ही पक्षांमध्ये बाचाबाची झाली. वाद सोडवण्याची वेळ संध्याकाळी ४ वाजता निश्चित करण्यात आली होती, परंतु सरपंच गटाच्या गुंडगिरीविरुद्ध विरोधी पक्षाने पोलिस हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार दाखल केली.
सकाळी ९.३५ च्या सुमारास, कोट मोहम्मद खान गावात दोन्ही पक्ष पुन्हा एकमेकांशी भिडले. जेव्हा पोलीस उपनिरीक्षक चरणजित सिंग यांनी वाद सोडवण्यासाठी सरपंच गटाला मागे हटण्यास सांगितले तेव्हा आरोपींनी त्यांचे रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतले. त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. चरणजित सिंग गंभीर जखमी झाले. आरोपीने एएसआय जसबीर सिंग यांना मारहाण करून त्यांचा हात तोडला. उपचाराला नेण्यापूर्वी चरणजित सिंग यांचा मृत्यू झाला.







