आमदार संदीप क्षीरसागरांविरोधात नगर परिषदेतील लेखापालला शिवीगाळ, धमकी दिल्याचा आरोप

आमदार संदीप क्षीरसागर

बीड (प्रतिनिधी) : आमदार संदीप क्षीरसागर यांनी नगर परिषदेमध्ये लेखापाल पदावर कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. गणेश तुळशीराम पगारे असे लेखापाल असलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी पगारे यांनी संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.

 

काही दिवसांपूर्वी आमदार संदीप क्षीरसागर यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती, त्यात त्यांनी नायब तहसीलदाराला धमकी दिल्याचे ऐकायला मिळाले. आता संदीप क्षीरसागर यांनी बीड नगर परिषदेतील लेखापालला शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना समोर आली आहे.

गणेश पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मी पगारे गणेश तुळशिराम (वय ५७, रा. स्नेहनगर बीड) जातीने अनुसूचित जाती पैकी आहे. मी बीड नगर परिषद बीड येथे लेखापाल या पदावर कार्यरत आहे. आज १२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९.१४ वाजता तीन मिसकॉल आमदार साहेबांचे आले, पण माझा फोन सायलेंट मोडवर होता. आज सुट्टी असल्याने मी झोपलो होतो, त्यातच माझ्या मुलाचा फोन त्यांचे आईला आला की, खाली कोणी तरी लोक आले आहेत. मग मी झोपेतून उठून बाहेर आलो, तर चौरे नामक आमदार क्षीरसागर यांचे स्वीय सहायक आलेले होते व त्यांचे सोबत दूसरे कोण होते. त्यांना मी ओळखत नाही. मग मी चौरेंना विचारले काय झाले? तर ते म्हणाले, आमदार साहेब बोलणार आहेत. मी म्हणालो मी माझ्या फोनवरुन बोलतो तर ते म्हणाले नाही माझ्या फोनवरच बोला. तर मी चौरेकडून फोन घेतला, तर तिकडून आमदार साहेब मला म्हणाले की, कारे नुसता गोड गोड बोलतो ***चोद असे म्हणत त्यांनी शिवीगाळ केली. तसेच, आता मी बीडला आल्यावर लवकर माझ्याकडे यायचे असे म्हणत शिवीगाळ केली. मी त्यांना सारखे भैय्या काय झाले? मला सांगा, तर ते फक्त शिव्या व वार करण्याची भाषा करत होते. मी घरी माझ्या कुटुंबाला सांगितले तर माझे कुटुंब भयभीत झालेले आहे. सध्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्याचे दिवस असून आम्ही त्या आनंदात आहोत. परंतु, बीडचे आमदार मा. संदीप रवींद्र क्षीरसागर यांनी मला शिव्या दिल्यामुळे आम्ही भयभीत झालेलो आहोत, असे पगारे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

लेखापाल गणेश पगारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार यांच्यासह पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. तसेच माझे कुटुंब भयभीत पोलिस संरक्षण देण्याची मागणी देखील पगारे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here