कल्याणमधील खासगी वसतिगृहात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; मुलांना मारहाण

rape
file photo

ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) : येथील एका खासगी वसतिगृहात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना जिल्हा महिला बाल कल्याण समितीच्या पाहणीत उघड झाली असून, वसतिगृहातील मुलांना मारहाण केल्याचीही माहिती मिळत आहे.

 

कल्याण- टिटवाळा जवळच्या खडवली येथे असलेल्या पसायदान नावाच्या खाजगी वसतिगृहात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. या सोबतच वसतिगृहातील मुलाना अनेक दिवसांपासून मारहाण केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच वसतिगृहाच्या संचालकासह पाच जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसतिगृहाचा कर्मचारी प्रकाश गुप्ता याने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केले. या घृणास्पद कृत्यामुळे परिसरात एकच संताप व्यक्त होत आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वसतिगृहाचे संचालक बबन शिंदे, त्यांची पत्नी आशा शिंदे, मुलगा प्रसन्न शिंदे, शाळेतील शिक्षिका दर्शना पंडित आणि कर्मचारी प्रकाश गुप्ता यांचा समावेश आहे.

पसायदान या वसतिगृहात बेघर, निराधार आणि गरीब गरजू मुलांच्या राहण्याची सोय आहे. तसेच जवळच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली जाते. सध्या या ठिकाणी १२ ते १५ मुले राहत असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी या वसतिगृहात मुलांना मारहाण होत असल्याची तक्रार ठाणे जिल्हा महिला बाल कल्याण समितीकडे आली होती. या तक्रारीची दखल घेत समितीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने वसतिगृहाची पाहणी केली.या पाहणीदरम्यान समितीच्या सदस्यांनी मुलांना विचारले असता मारहाणीची बाब समोर आली.

याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर कल्याण तालुका पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पाचही आरोपींना अटक केली. कल्याण तालुका पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here