पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) : पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पैसे नसल्याने एका गरोदर महिलेवर वेळेत उपचार न झाल्याने तिला आपला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आल्यानंतर राज्यातील विविध शहरांमधील खासगी रूग्णालयांकडून रुग्णांच्या नातेवाइकांना लुटले जात असल्याचा आरोप होत आहे, पंढरपुरमध्ये सुध्दा कांही खासगी रूग्णालयांकडून अशा प्रकारे लुट होत असल्याचा खळबळजनक आरोप पंढरपुरातील समाजसेवक तथा महर्षी वाल्मिक संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे.
याद्वारे गणेश अंकुशराव यांनी म्हटलं आहे की, पंढरपूर शहरातील काही खासगी रूग्णालयात विविध उपचारासाठी अवाजवी रक्कम आकारली जाते, रूग्णांच्या नातेवाईकांकडून उपचारादरम्यान भरमसाठ पैसे वसुल केले जातात. गर्भवती महिलांचे सिझर, विविध प्रकारची ऑपरेशन्स, सोनोग्राफी, मेडीकल, रक्त लघवी च्या विविध चाचण्या यासाठी अव्वाच्या सव्वा फी वसुल केली जाते. गरीब रूग्णांच्या फी संदर्भातील महात्मा फुले जन आरोग्य व अशा अनेक शासकीय योजनांमध्ये सुद्धा घोटाळा आहे, तसेच धर्मादाय हॉस्पिटलमध्ये सुध्दा नीट काम चालते की नाही हेही पाहणे गरजेचे आहे.
याबाबत अनेक तक्रारी समोर आल्या आहेत, परंतु यावर कुणी बोलत नाही म्हणूनच सर्व काही अलबेल सुरू आहे. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी संबंधित शासकीय यंत्रणेने करायला हवी आणि जर उपचारासाठी अवाजवी रक्कम कोणी आकारत असतील तर अशा रुग्णालयावर व संबंधित डॉक्टरांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी. तसेच उपचाराचे प्रकार व त्यासंदर्भातील हॉस्पीटल ची फी तसेच सिझर फी , विविध प्रकारची ऑपरेशन्स फी, सोनोग्राफी फी, रक्त लघवी चाचणीनुसार ची फी यासंदर्भाची माहिती असलेले फलक पंढरपूर शहरातील सर्वच मोठमोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये, सोनोग्राफी सेंटर मध्ये, रक्त तपासणी लॅब मध्ये लावण्याची सक्ती करावी. अशी मागणीही गणेश अंकुशराव यांनी केली आहे.
पंढरपूर शहरात माफक दरात रूग्णसेवा करणारी अनेक सज्जन डॉक्टर मंडळी आहेत तशी रूग्णांकडून अवाजवी फी वसुल करणारे व रुग्ण व नातेवाईका़ची लुट करणारे काही दुर्जन डॉक्टर ही असल्याची कुजबुज असून याचा सखोल तपास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी करावा. असंही गणेश अंकुशराव यांनी म्हटलंय.