सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : सोने गहाण ठेऊन त्यापोटी मुद्दल व व्याजासह परतफेड केली. तरीही पुन्हा व्याजासह मुद्दलची मागणी करून दागिने देण्यास नकार देणार्या महिलेस काही महिलांनी पोलीस ठाण्यातच शिवीगाळ करून चांगलाच चोप दिला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे गावभाग पोलिस ठाण्यात पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. या घटनेनंतर पोलीस ठाण्यासमोर नागरिकांनी गर्दी केली होती.
मारहाण झालेल्या महिलेचे नाव पद्मजा इंगवले (रा.मंगळवार पेठ) असे आहे. याबाबत सौ. सुदर्शन उर्फ गंगा प्रशांत कांबळे (रा. टाकवडे वेस ) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी पद्मजा इंगवले या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. टाकवडे वेस परिसरात राहणार्या गंगा कांबळे यांची मंगळवार पेठ येथे राहणार्या पदमजा इंगवले यांच्याशी ओळख झाली होती. यावेळी इंगवले यांनी सामाजिक कार्यकर्त्या असल्याचे सांगितले होते. ओळखीतून इंगवले यांच्याकडे 4 तोळे दागिने गहाण ठेवून यांनी 87 हजार रुपये घेतले होते. यावेळी इंगवले यांनी 2 टक्के व्याज बसेल असे सांगितले होते.
वेळोवेळी मुद्दल व व्याज परत केले असतानाही इंगवले यांनी दागिने दिले नाहीत. त्यांच्या भावानेही 5 टक्केव्याज आकारून दुप्पट रक्कम नावे घेऊन ठेवली होती. दागिने मागणी केले असता इंगवले यांनी 5 टक्केव्याज दिल्याशिवाय दागिने देणार नाही असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करून अपमानास्पद वागणुक दिली.
दागिने बुडवण्याच्या हेतुने फसवल्याचे निदर्शनास आल्याने गंगा कांबळे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी कुबडगे, सावित्री हजारे यांना याबाबत कल्पना दिली. या सर्व महिलांनी बुधवारी सायंकाळी इंगवले यांच्या घरी जाऊन गंगा कांबळे यांचे दागिने मागितले. मात्र तेथेही इंगवले यांनी दाद दिली नसल्याचे या तक्रार अर्जात नमुद केले आहे.
पद्मजा इंगवले यांच्यावर खाजगी सावकारी व जातीवाचक शिवीगाळ करणे व दागिने हडप करणेप्रकरणी कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सौ. सुदर्शन उर्फ गंगा प्रशांत कांबळे (रा.टाकवडे वेस) यांनी पोलीस उपअधिक्षक तसेच गावभाग पोलीस ठाण्याकडे लेखी अर्जाद्वारे केली आहे.
मंगळवार पेठेतही वादावादी प्रकार घडल्याने हे प्रकरण पोलीस ठाण्यात आले. यावेळी पोलीस ठाण्यातच पद्मजा इंगवले व इतर महिला एकमेकींना भिडल्या. यावेळी इंगवले यांना महिलांनी चोप दिला. वारंवारच्या घटनांमुळे महिलांची बदनामी होत असून अशा प्रवृतीला थारा देऊ नये अशी मागणी करत चांगलाच संताप व्यक्त करत होत्या. पोलिसांसमोरच मारहाणीचा प्रकार घडल्याने महिलांना रोखताना पोलिसाची तारांबळ उडाली. काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी इंगवले या संशयीत महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.







