गडचिरोलीत पोलीस उपनिरीक्षकाच्या बहिणीचा खुन करणा-या आरोपीस पुणे पोलिसांनी केले जेरबंद

अटक

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : पोलीस उपनिरीक्षकाच्या बहिणीच्या डोक्यात मारुन तिचा खुन करुन पुण्यात पळून आलेल्या विशाल ईश्वर वाळके (वय ४०, रा. सुयोगनगर, नवेगाव,गडचिरोली) या गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलिसांनी नरवीर तानाजीवाडी परिसरात जेरबंद केले. कल्पना केशव उंदिरवाडे (वय ६४, रा़ कल्पना विहार, सुयोगनगर, नवेगाव, ता़ जि़ गडचिरोली) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे.

 

याबाबत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मोहन काशीनाथ सोनकुसरे (वय ५७, रा. इंदिरानगर, लांझेडा, ता.जि. गडचिरोली) यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोहन सोनकुसरे हे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक असून ते गडचिरोली पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. त्यांची मोठी बहिण कल्पना उंदिरवाडे ही जिल्हा परिषदमध्ये कक्ष अधिकारी होती. तेथून ती २०१८ मध्ये सेवानिवृत्त झाली होती. तिच्या पतीचे २०२२ मध्ये निधन झाले आहे. घरात ती व तिचा मुलगा उत्कल (वय २५) हे दोघेच रहतात. तिला मुलबाळ नसल्याने तिने उत्कल याला १० दिवसांचा असताना दत्तक घेतले आहे.

१३ एप्रिल रोजी ते दुपारी मुख्यालयात जात असताना त्यांना कल्पना ही घरात पडलेली असून तिच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे समजले. ते तिच्या घरी गेले असताना कल्पना बेडरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. कोणीतरी तिच्या डोक्यात हत्याराने वार करुन तिचा खुन केला होता. यावेळी उत्कल हा परिक्षेसाठी गेला होता. गडचिरोली पोलिसांनी तपास करताना त्यांचा भाडेकरु विशाल वाळके याच्याकडे प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला दुपारनंतर पुन्हा बोलविले होते. परंतु, विशाल हा तेथून पळून गेला. पोलिसांनी केलेल्या तपासात विशाल याने कल्पना यांच्या मोबाईलवरुन काही व्यवहार केल्याचे निष्पन्न झाले. तसेच आदल्या दिवशी रात्री उशीरापर्यंत तो त्यांच्या घरात असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे पोलिसांचा विशाल वरील संशय वाढला होता. विशाल वाळके याचा सर्वत्र शोध सुरु होता.
विशाल वाळके हा शिवाजीनगर येथील नरवीर तानाजी वाडी येथे असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी सकाळी विशाल याला पकडले. गडचिरोली पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल आव्हाड व पोलीस उपनिरीक्षक दीपक चव्हाण हे पुण्यात आल्यावर त्यांच्याकडे विशाल वाळके याला हवाली केले. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चंद्रकांत सूर्यवंशी, पोलीस अंमलदार प्रमोद मोहिते, चौबे, आहेर, माने, भोसले, हंडगर, सांगवे, गायकवाड यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here