पुण्यात मध्यवर्ती भागातून १३ लाखांचे ड्रग्स जप्त

drugs
file photo

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : शहराच्या मध्यभागातून एका सराईताला पकडून पुणे पोलिसांनी नंतरच्या तपासातून एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उघड केलेले असताना आता नाना पेठेतून मॅफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ विकण्यास आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. छापेमारीत त्यांच्याकडून तब्बल ११ लाख ४० हजारांचे एमडीसह इतर असा १३ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

अदीब बशीर शेख (२९, रा. नाना पेठ), यासीर हशीर सय्यद (३०, रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शहरात ड्रग्ज सप्लायरचे जाळे मोठ्याप्रमाणात वाढले आहे. या सप्लायरवर पुणे पोलिसांची नजर असली तरी ग्राहकांपर्यंत ड्रग्ज पोहच होत असल्याचेही दिसून आलेले आहे. यापार्श्वभूमीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीत गस्त व पेट्रोलिंग करत होते.
त्यादरम्यान नाना पेठ भागात दोघेजण थांबले असून त्यांच्याकडे एमडी असल्याची माहिती पथकाला मिळाली. यानूसार, पथकाने परिसरात सापळा रचला. तसेच, संशयित दोघे दिसताच पथकाने शेख, आणि सय्यद या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता एमडी आढळून आले. दोघांवर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, अंमलदार आझाद पाटील, मयूर सुर्यवंशी, साहिल शेख यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here