सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : बार्शी शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत गुरुवारी दि. १७ रोजी रात्री साडे अकरा वाजता सुमारे १४ लाख रुपयाच्या ड्रग्जच्या मुद्देमालासह एक पिस्तूल आणि तिघांना अटक केली आहे.
शहरात देखील ड्रग्ज सापडल्याने बार्शी शहर पोलीस दल सतर्क झाले आहे. याबाबत संशयितांना बार्शी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे १४ लाख रुपयाचा ऐवजही पोलिसांनी जप्त केला आहे. गुरुवार दि. १७ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास परंडा रोड येथील एका हॉटेल समोर एका वाहनात मोठ्या प्रमाणात ड्रग असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचत एक चार चाकी वाहनासह तिघांना ताब्यात घेतले आहे.
या तिघांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि पिस्तूलसह दोन जिवंत काडतूसे ताब्यात घेतले आहेत. याबाबत पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांनी गुन्हा दाखल केला आहे. बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हसन दहलूज (वय ३७), रा. पल्ला गल्ली परांडा, मेहबूब मोहम्मद शेख (वय १९) (रा. बावची, ता. परंडा) आणि सरफराज उर्फ गोल्डी असलम शेख (वय ३२ वर्षे रा. काझी गल्ली, बार्शी) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली असून याप्रकरणी एन. डी. पी. एस. कायद्यानुसार शस्त्र कायदा, आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी तुळजापूर येथे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मिळून आले होते. याबाबत बार्शीच्या घटनेशी संबंध आहे की काय याबाबत पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, उपाधीक्षक जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे तपास करीत आहेत.