पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर मला होती, असा दावा करणारे बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले हे मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. सोशल मीडियावर ते व्हिडीओ टाकून गंभीर आरोप करत होते.
रणजीत कासले बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. सायबर विभागात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी ते परवानगीशिवाय परराज्यात गेले होते. परराज्यात त्यांनी आरोपींकडून पैशांची देवाणघेवाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आणि त्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले.
पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या हॉटेलमधून आज (शुक्रवारी) पहाटे बीड पोलिसांनी कासले यांना ताब्यात घेतलं आहे. काल दिल्लीवरून पुण्यात आल्यानंतर कासले पुण्यात मुक्कामी होते. पुणे विमानतळावर काल (गुरूवारी) रणजीत कासले यांनी पुन्हा गंभीर आरोप केले होते. पुणे पोलिसांकडे सरेंडर होऊन बीड पोलिसांकडं अटक होणार असं रणजीत कासले यांनी सांगितलं होतं. मात्र आज पहाटे रणजीत कासले मुक्कामी असलेल्या हॉटेलमधून बीड पोलिसांनी कसले यांना ताब्यात घेतलं आहे. कासलेंना ताब्यात घेतल्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे.