सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा येथील मोठा खडा मशिदीच्या बाहेर एका अज्ञात व्यक्तीने तीन ते चार महिन्यांच्या बालकाला सोडून पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सावदा शहरात चिंता आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.
प्राप्त माहितीनुसार, ही घटना जुमेरात (ता. २४ एप्रिल २०२५) सकाळी उघडकीस आली. स्थानिक नागरिकांना मशिदीच्या बाहेर एका कपड्यात गुंडाळलेले मृत बालक आढळून आले. या बालकाला कोणी तरी सोडून गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे. नागरिकांनी तातडीने याबाबत सावदा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बालकाला ताब्यात घेतले असून, त्याला वैद्यकीय तपासणीसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.नागरिकांमध्ये संताप, पोलिसांचा तपास सुरू
या घटनेने सावदा शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “एखाद्या मृत निरागस बालकाला अशा प्रकारे रस्त्यावर सोडून जाणे ही अत्यंत अमानुष कृती आहे,” अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. काही नागरिकांनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे.सावदा पोलिस ठाण्याचे निरीक्षक विशाल पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. “बालकाला सोडून जाणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. लवकरच या प्रकरणाचा छडा लावला जाईल,” असे पोलिसांनी सांगितले.







