डोनाल्ड ट्र्म्प यांच्या नावाने शेकडो भारतीयांना कोट्यवधींचा गंडा

डोनाल्ड ट्र्म्प

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. या घोटाळ्यात शेकडो भारतीयांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे, सर्वसामान्य नागरिकांसह सरकारी कर्मचारी, वकील आणि व्यावसायिक व्यक्तीही या फसवणुकीला बळी पडले आहेत. यासंदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे. या घोटाळ्यात जवळपास ८०० हून अधिक लोकांनी कोट्यवधी रुपये गमावले असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरू, तुमकुरू, मंगळुरू आणि हवेरी याठिकाणी सायबर चोरी झाल्याची अनेक प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. ‘ट्रम्प हॉटेल्स रेंटल्स’ या योजनेत पैसा लावणारे अनेक लोक फसवणुकीला बळी पडले आहेत. गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळेल या आशेने अनेकांनी या योजनेत कर्ज काढून पैसे गुंतवले असल्याचं समोर आलं आहे. फसवणूक झालेले अनेक गुंतवणूकदार आता त्यांचे कष्टाचे पैसे वसूल करण्यासाठी पोलिसांसमोर विनवण्या करीत आहेत. आयुष्याची जमापुंजी या योजनेत गुंतवणारे लोक पैसे गडप झाल्याने मेटाकुटीला आले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘एआय’ने तयार केलेला व्हिडीओ वापरून कर्नाटकमधील काही शहरांमध्ये अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या हॉटेल व्यवसायात गुंतवणूक केल्यास त्यावर मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून जवळपास ८०० लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. यातील २०० प्रकरणं एकट्या कर्नाटक राज्यातील आहेत.
५०० रुपयांची गुंतवणूक केल्यास दिवसाला ३० रुपयांचा परतावा मिळेल, अशी माहिती या अॅपमध्ये देण्यात आली होती. सुरुवातीला काही लोकांनी या योजनेत पैसे गुंतवले. त्यांच्या प्रोफाईलवर दिवसाला ३० रुपये जमा होत होते. या कमाईचा ओघ पाहून अनेकांच्या मनात लालसा निर्माण झाली. बघता-बघता शेकडो लोकांनी अॅपवर पाच हजार ते एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवली. परंतु, जेव्हा काहींनी हे पैसे विड्रोल करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना टॅक्सच्या नावाखाली आणखी पैसे मागण्यात आले. टॅक्स भरूनही पैसे निघत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे अनेकांच्या लक्षात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील अनेक शहरांतील नागरिक या अमिषाला बळी पडले आहेत. अवघ्या पाच ते सहा महिन्यांत सायबर चोरट्यांनी ‘ट्रम्प हॉटेल्स रेंटल्स’ या फसव्या योजनेच्या नावाखाली ८०० हून अधिक लोकांना गंडा घातला आहेत. या फसवणुकीला बळी पडलेल्या ३८ वर्षीय वकिलासह आतापर्यंत २०० हून अधिक लोकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत, ज्यामध्ये सरकारी कर्मचारी, वकील, व्यावसायिकांचा समावेश आहे. फसव्या अॅपद्वारे सुमारे २ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं सांगितलं आहे. हे प्रकरण समोर येताच पोलिसांनी आयटी कायदा आणि भारतीय न्याय संहिताच्या कलम 318(4) अंतर्गत अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here