वाहन वळविण्यावरून झालेल्या वादातून लोणावळ्यात पर्यटकाचा खून

murder

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : वाहन वळविण्यावरून झालेल्या वादातून एका एका पर्यटकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (२५ मे) रात्री लोणावळ्याजवळील कार्ला फाट्याजवळील दहिवली गावातील फार्महाऊसजवळ घडली आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात नऊ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटकदेखील केली आहे.

कमलेश तानाजी धोपावकर (वय ४५, रा. आडूर कोंडकरूल, गुहागर, रत्नागिरी) असे खून झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. मनोज मधुकर वरवटकर (वय ४२), प्रज्वल उदय मेहता (वय २६) अशी जखमींची नावे आहेत. तिघेही रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. ते पर्यटनासाठी आणि एकवीरा देवीच्या दर्शनासाठी लोणावळ्यात आले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी कमलेश व त्यांचे काही मित्र लोणावळ्यात आलेले होते. सायंकाळी कार्ला फाटा परिसरातील दहिवली गावाजवळ वाहन वळविण्यावरून पर्यटक व स्थानिक तरुणांमध्ये वाद निर्माण झाला. वादातून हाणामारी झाली. स्थानिकांनी लोखंडी गज, दांडके, कारच्या वायपरनी पर्यटकांवर हल्ला केला. हल्ल्यात कमलेश धोपावकर यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली. त्यांना त्वरित रुग्णालयात नेले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दोघे पर्यटक जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत मनोज वरवटकर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी निकेश कांबिरे (रा. कर्जत, रायगड), प्रतीक देशमुख, यश कैलास पडवळ (दोघे रा. वेहेरगाव, मावळ), गौरव संजय पट्टाधारी (रा. तुंगार्ली, लोणावळा) यांच्यासह अन्य चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रशांत आवारे तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here