बालरंगभूमी क्रिकेट लीगचे अध्यक्ष अॅड.निलम शिर्के सामंत यांच्या हस्ते उदघाटन

बालरंगभूमी क्रिकेट लीग

मुंबई (संपादक सुनिल पाटील) : बालरंगभूमी परिषद सातत्याने लहान बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करीत असते. मात्र हे उपक्रम राबविण्यासाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या बालरंगभूमी परिषदेच्या सभासदांकरिताही उपक्रम राबवावेत या उद्देशातून तसेच त्यांच्यातील संघटनकौशल्य वाढण्यासोबत त्यांच्या शारीरिक आरोग्यवाढीसाठी बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्ष ॲड.निलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून दि. ३० व ३१ मे २०२५ रोजी बालरंगभूमी क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले आहे.

क्रिकेट हा खेळ संघभावना वाढविणारा खेळ आहे. आज (दि.३०) बालरंगभूमी क्रिकेट लीगचे उदघाटन नटराजपूजनाने करण्यात आले. याप्रसंगी बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष अॅड.निलम शिर्के सामंत, उपाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, कोषाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, सहकार्यवाह दिपाली शेळके, आसेफ शेख अन्सारी, कार्यकारिणी सदस्य त्र्यंबक वडस्कर, नागसेन पेंढारकर, वैदही चवरे सोईतकर, योगेश शुक्ल तसेच बालरंगभूमी परिषद नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष शुभम चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.

दि. ३० व ३१ मे असे दोन दिवस ऐरोली नवी मुंबई येथील युरो इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर रंगणाऱ्या या क्रिकेट लीगमध्ये महाराष्ट्रातून रत्नागिरी, जळगाव, पुणे, नंदुरबार, सोलापूर, लातूर, पंढरपूर, परभणी, बृहन्मुंबई, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), धुळे, कोल्हापूर, अहिल्यानगर (अहमदनगर) येथील बालरंगभूमी परिषदेच्या सभासदांचे संघ सहभागी होणार आहेत. या सामन्यांचे फेसबुक, इन्स्टाग्राम व युट्यूबवर लाइव्ह प्रक्षेपण करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here