बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी सचिन जगदाळे) : दिनांक ६ जून रोजी मलकापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 351/25, भादंवि कलम 115(2), 118(2), 3(5) अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा असूनही संबंधित आरोपी अद्याप मोकाट फिरत आहेत. सदर गुन्हा माझ्या (अश्फाक खा उस्मान खा, रा. धनगरपुरा, मलकापूर) तक्रारीवरून नोंदवण्यात आलेला आहे.
या गंभीर प्रकरणात आरोपींनी आम्हाला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या असून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत आहेत. आजपर्यंत मी संबंधित पोलीस ठाणे, उपविभागीय अधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक, व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे वेळोवेळी लेखी व वाचिक स्वरूपात तक्रार केली. मात्र, कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही.
राजकीय पाठबळाचा व आर्थिक सामर्थ्याचा वापर करून आरोपी कायद्याला थट्टेत उडवत आहेत, आणि पोलीस प्रशासन त्यांच्यासमोर हतबल झाल्याचे दिसते. हे केवळ पीडितांच्याच नव्हे तर सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षिततेचाही प्रश्न आहे. घटनास्थळी कार्यरत असलेले CCTV कॅमेरे हे गुन्ह्याच्या पुराव्याचे महत्त्वाचे साधन असून पोलिसांनी अजूनपर्यंत त्या फुटेजची जप्ती केलेली नाही. त्यामुळे ते फुटेज जाणीवपूर्वक नष्ट केले जाऊ शकते, याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत IPC कलम 201 अंतर्गत आरोपींवर पुरावे नष्ट करण्याचा स्वतंत्र गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे.
यावेळी त्यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे, मला व माझ्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण प्रदान करण्यात यावे, पोलिस अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, घटनास्थळी असलेले CCTV फुटेज तातडीने जप्त करून सुरक्षित करण्यात यावे आदी मागण्या केल्या आहेत. याप्रकरणी जर तात्काळ कार्यवाही झाली नाही, तर मानवाधिकार आयोग, उच्च न्यायालय आणि राज्य पोलीस महासंचालनालय यांच्याकडे तक्रार दाखल करावी लागेल.







