चाळीसगाव (प्रतिनिधी गोरख पारधी) : पाल येथील कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभाग चोपडा व आत्मा जळगाव यांनी धानोरा, पंचक व लोणी येथे विकसित कृषी संकल्प अभियान राबवले. त्यात शुक्रवार दिनांक 10 जून 2025 रोजी शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया, ड्रोनद्वारे फवारणी, गुरांसाठी मुरघास, केळी कंद प्रक्रिया प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
राजगुरूनगर येथील राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संचालनालय प्रधान वैज्ञानिक डॉ. अमरजित गुप्ता यांनी कांद्याच्या विविध वाणांची माहिती व वैशिष्ट्ये सांगितली. पाल येथील कृषी विज्ञान केंद्र प्रमुख शास्त्रज्ञ डॉ महेश महाजन यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत माहिती दिली. बीज प्रक्रियेचे महत्व सांगून प्रात्यक्षिक करून दाखवले, जैविक कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना सांगितल्या, डॉ हेमराज भंडारी, वरिष्ठ शास्त्रज्ञ, राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर यांनी कीडरोग व्यवस्थापन मार्गदर्शन केले.
डॉ सुहास अमृतकर, सहाय्यक प्राध्यापक, पशुविज्ञान महाविद्यालय अकोला यांनी मुरघास तंत्रज्ञान व पशु रोग संदर्भात मार्गदर्शन केले. डॉ धीरज नेहेते, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, पाल यांनी कांदा, भाजीपाला खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले. तसेच , शास्त्रज्ञ, कृषीविद्या यांनी कापूस, मका व केळी, तूर पिकाचे आधुनिक पद्धतीचे लागवड व्यवस्थापन पर मार्गदर्शन केले. इफको कंपनीचे प्रतिनिधी यांनी प्रात्यक्षिकात ड्रोनच्या सहाय्याने फवारणी करून त्याचे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगितले. वेळ, खर्च व मजूर बचतीसह अचूक फवारणीचा लाभ कसा मिळतो याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. या कार्यक्रमाला -श्री. दिपक साळुंखे साहेब तालुका कृषी अधिकारी व श्री.जे.ऊ.सोनवणे मंडळ कृषी अधिकारी अडावद व श्री. जे. व्ही. सनेर, श्री.किशोर महाजन, किरण पाटील, जयदीप पाटील सहाय्यक कृषी अधिकारी श्री महेंद्र साळुंखे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा आणि कृषी विभाग कर्मचारी उपस्थित होते. कृषी संकल्प अभियानांतर्गत प्रशिक्षणाला उपस्थित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







