जळगाव (संपादक सुनिल पाटील) : जिल्ह्यात गोवंश तस्करीचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस वारंवार कारवाया करत असतानाही तस्करांचे धाडस दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याच धाडसी प्रकरणात रविवारी रात्री एक खळबळजनक घटना घडली. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गोवंश तस्करी करणाऱ्या इनोव्हा वाहनाचा शर्थीने पाठलाग करत त्यास अकोला जिल्ह्यात पकडले. मात्र वाहनातील तस्करांनी पोलिसांवर हल्ला करत निरीक्षक संदीप पाटील यांना वाहनाने चिरडण्याचा प्रयत्न केला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून सध्या उपचार घेत आहेत.
रविवारी रात्री एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक अनिल जाधव व चालक दर्शन ढाकणे हे जळगाव जिल्ह्यात गस्तीवर होते. मुक्ताईनगरजवळ त्यांनी एक इनोव्हा गाडी गोवंश तस्करी करत असल्याच्या संशयावरून थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहन चालकाने थांबण्याऐवजी वेगात गाडी पळवली आणि थरारक पाठलागाला सुरुवात झाली.
मुक्ताईनगरपासून मलकापूर, नांदुरा, बाळापूरमार्गे पथकाने तब्बल 100 किमी पेक्षा अधिक अंतराचा पाठलाग करत अकोलाजवळ संबंधित इनोव्हा वाहनाला ओव्हरटेक करून थांबवले. या वेळी संदीप पाटील यांनी गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता, तस्कराने इनोव्हा रिव्हर्स घेत त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. यात त्यांच्या छातीला आणि बरगड्यांना दुखापत झाली असून पाय आणि चेहरा खरचटला आहे. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा बचाव केला.
तरीही संदीप पाटील यांनी हार न मानता वाहन आणि मुख्य चालकास ताब्यात घेतले. मात्र वाहनातील इतर तिघे आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाले. यानंतर त्यांनी तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षास तसेच खामगाव व अकोला पोलिसांना माहिती दिली.







