रोजलॅण्ड शाळेचा फाऊंडर्स डे उत्साहात : पर्यावरण संवर्धनाच्या सकारात्मक संदेशासह स्व. दौलत खिमानी यांना श्रद्धांजली

दौलत खिमानी

जळगाव (उपसंपादक नंदुअप्पा पाटील) : येथील रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम शाळा आणि मराठी माध्यमातील शाखेत नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात प्रेरणादायी वातावरणात आणि उत्साहात पार पडली. शाळेच्या संस्थापक स्वर्गीय दौलत खिमानी यांच्या स्मृतिदिनानिमित्त या दिवशी ‘फाऊंडर्स डे’ साजरा करण्यात आला. त्यांच्या आठवणींना उजाळा देत, विद्यार्थ्यांचे स्वागत खास उपक्रमांनी आणि पर्यावरणप्रेमाचा संदेश देत करण्यात आले.

स्व. खिमानी यांनी १६ जून २००७ रोजी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पर्यावरणप्रेमी विचारांप्रमाणे, शाळेने नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात हिरवळ, सर्जनशीलता आणि समाजभान यांच्या संदेशासह केली. याच दिवशी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनकार्याची ओळख करून देत त्यातून प्रेरणा घेण्याचा संदेश देण्यात आला.
या विशेष दिवशी शाळेने एक सामाजिक उपक्रम हाती घेतला. मराठी माध्यमातील बालवाडी आणि इंग्रजी माध्यमातील नर्सरी वर्गांमध्ये यंदा एकूण १८ मुलींना मोफत प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सुविधा २५ जून २०२५ पर्यंत खुली राहणार आहे.
शाळेच्या इंग्रजी आणि मराठी दोन्ही विभागांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे ‘Back to School’ जल्लोषात स्वागत केले. खेळ, गीतं, गोष्टी आणि हस्तकला यांद्वारे विद्यार्थ्यांसाठी आनंदमय वातावरण तयार करण्यात आले.
प्रत्येक विद्यार्थ्याला हस्तनिर्मित पर्यावरण चष्मा भेट म्हणून देण्यात आला होता, ज्यावर “पाणी वाचवा”, “झाडे जगवा” अशा प्रेरणादायी घोषणा लिहिल्या होत्या. चष्म्याच्या मागे एक पेन्सिल लावण्यात आली होती, जी शिक्षण आणि सर्जनशीलतेचे प्रतीक आहे.
पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी फुलं, पाने, गवत यांचा वापर करून सुंदर ग्रीटिंग कार्ड्स तयार केली. या सर्जनशील कृतीतून त्यांनी निसर्गातील रंग, गंध आणि सौंदर्य अनुभवले आणि त्यातून निसर्गप्रेमाची बीजे मनामध्ये पेरली. शाळेच्या सर्व शिक्षकांनी नवागत विद्यार्थ्यांचे हसतमुख स्वागत करत पर्यावरण जागृतीचे महत्त्व समजावून सांगितले. शाळेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ. रोजमीन खिमानी प्रधान यांनी सांगितले. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेम आणि सामाजिक भान निर्माण व्हावे, हाच आमचा प्रयत्न आहे. रोजलॅण्ड शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी केवळ अभ्यासाचा प्रारंभ नव्हता, तर तो निसर्गप्रेम, सामाजिक जाणीव आणि संस्थापकांच्या मूल्यांचा आदर्श घेणारा एक अविस्मरणीय दिवस ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here