जळगाव (संपादक सुनिल पाटील) : शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील सिद्धीविनायक चौकात रात्रीच्या वेळी बंद असलेल्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमधून चोरट्यांनी संगणकाचे तीन संगणक संच चोरून नेल्याची घटना दि. १४ जून रात्री ते १५ जून रोजी सकाळी सात वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिद्धीविनायक चौकामध्ये मनीषा विशाल पाटील (वय ४३) यांचे घराशेजारीच कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट असून, शनिवारी दि. १४ जून रोजी रात्री ८ वाजता इन्स्टिट्यूट बंद केले होते. मध्यरात्री चोरट्यांनी इन्स्टिट्यूटच्या दरवाजाचा कडीकोयंडा कापून आतमध्ये प्रवेश करून ३ मॉनिटर, ३ सीपीयू, ३ की बोर्ड, ३ माऊस व केबल आदी साहित्य चोरून नेले. रविवारी दि. १५ रोजी सकाळी सात वाजता हा प्रकार लक्षात आला.
या प्रकरणी मनीषा पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण इंगळे करीत आहेत.







