सावदा ( प्रतिनिधी अजहर खान) : रावेर तालुक्यातील वाघोदा बुद्रुक येथील बस स्टँड ते ग्रामपंचायत रस्त्यावर नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या कामामुळे महावितरणच्या विद्युतवाहक तारांशी संबंधित गंभीर धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या बांधकामामुळे रस्ता आणि विद्युत तारांमधील अंतर धोकादायकरीत्या कमी झाले असून, यामुळे भीषण विद्युत अपघात होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी महावितरणने सार्वजनिक बांधकाम विभाग, सावदा यांना पत्र पाठवून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
महावितरणचे कनिष्ठ अभियंता, वाघोदा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सावदा शाखा कार्यालयाला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की, वाघोदा बुद्रुक येथील नाल्यावरील नवीन पुलाच्या बांधकामात भरावामुळे पुलाची उंची वाढली आहे. यामुळे रस्ता आणि विद्युत तारांमधील अंतर कमी झाले असून, अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पत्रात असेही म्हटले आहे की, संबंधित बांधकाम तातडीने थांबवावे आणि विद्युत तारांची उंची वाढवणे किंवा त्या नियमानुसार अन्यत्र हलविण्याची व्यवस्था योग्य ठेकेदारामार्फत करावी. जोपर्यंत ही खबरदारी घेतली जात नाही, तोपर्यंत पुढील काम सुरू करू नये, अशी विनंती करण्यात आली आहे.
पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, या प्रकरणी कोणताही अपघात घडल्यास महावितरण कंपनी जबाबदार राहणार नाही. महावितरणने सार्वजनिक बांधकाम विभागाला बांधकामाशी संबंधित कार्यालय आणि ठेकेदार यांना त्वरित सूचना देण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून संभाव्य धोका टाळता येईल.








