मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन संपन्न

देवेंद्र फडणवीस

धरणगाव (उपसंपादक प्रा. पी एम पाटील) : येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करून ५० खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारण्याच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संपन्न झाला. यावेळी रुग्णालयाच्या मुख्य इमारत व वैद्यकीय अधिकारी निवासस्थानाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. याप्रसंगी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आ. सुरेश भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पी. पी. सोनवणे, कार्यकारी अभियंता सुभाष राऊत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
या प्रकल्पासाठी शासनाकडून ३९ कोटी ४६ लाख ७५ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून, २.५ एकर क्षेत्रात या उपजिल्हा रुग्णालयासह ट्रामा केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. यामुळे धरणगाव तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असून परिसरातील नागरिकांना विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यासह शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, बालरोग, बधिरीकरण आदी सुविधा मिळणार आहेत.

या उपजिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण विभाग, माता व बाल संगोपन विभाग, तात्काळ उपचार कक्ष, प्रयोगशाळा, प्रसूतीगृह, शवविच्छेदन, रुग्णवाहिका सेवा, नवजात अर्भक काळजी, क्ष-किरण, न्यायवैद्यकीय सेवा, नेत्र तपासणी, कुटुंबकल्याण, लसीकरण, रक्तपुरवठा केंद्र आणि संक्रमण प्रतिबंध केंद्र अशा सुविधा उपलब्ध राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here