जळगावात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्षाचा आत्मदहनाचा प्रयत्न

आत्मदहनाचा प्रयत्न

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : धरणगाव येथील क्रांतिवीर ख्वाजा नाईक यांच्या स्मारकाचे लोकार्पण आणि ग्रामीण रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर शुक्रवारी (दि.२० जून) काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्षाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. आकाशवाणी चौकात सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक घडलेल्या या प्रकाराने पोलीस यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. सकाळी दहाला मुंबईहून जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर शहरातील आकाशवाणी चौकातून मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा भरधाव जात असताना, राष्ट्रवादीच्या (शरद पवार) कार्यालयासमोर जळगाव काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संजय वराडे यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखून वराडे यांना वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील ऊर्जा विभागाच्या कामांचे कंत्राट घेतले असताना, चिंचोली येथील वीज उपकेंद्राच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात चोरी झाली. परिणामी, आपल्याला बरेच नुकसान सोसावे लागले. कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. चोरीच्या तपासाचे काम सोपविलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानेही आपल्याला न्याय दिला नाही. त्याच्याविषयी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करूनही काहीच उपयोग झाला नाही. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या रूपाने दुसरा वाल्मीक कराड जळगाव जिल्ह्यात तयार झाला आहे, असा आरोप संजय वराडे यांनी केला. मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषी पोलीस कर्मचाऱ्यावर आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अधीक्षकांवर कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here